Join us  

गुलाबी चेंडूने भारतीय गोलंदाजांचा मारा पाहण्याची उत्सुकता

अ‍ॅडम गिलख्रिस्ट : क्रिकेटमधील सकारात्मक प्रयोग यशस्वी होतोय; टी२०मुळे खेळाची व्यावसायिकता उंचावतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 6:02 AM

Open in App

रोहित नाईक 

मुंबई : ‘दिवस-रात्र कसोटी सामना खेळणे एक आव्हानच असते आणि भारतीय संघ आता अशी लढत खेळणार असल्याने आनंद आहे. भारताकडे शानदार गोलंदाजी मारा असून, गुलाबी चेंडूने ते कसा मारा करतात याची उत्सुकता आहे,’ असे ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पुढील वर्षी आॅस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या निमित्ताने टुरिझम आॅस्टेÑलियाच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी गिलख्रिस्ट, क्रिकेट समालोचक हर्षा भोगले व पश्चिम आॅस्टेÑलियाचे प्रीमियर मार्क मॅकगोवन मुंबईत उपस्थित होते. यावेळी भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याविषयी गिलख्रिस्ट म्हणाला की, ‘गुलाबी चेंडूने खेळताना भारतीय गोलंदाजांपुढे अचूकता कायम राखण्याचे आव्हान असेल. भारतीयांसाठी हा नवीन प्रकार असल्याने नक्कीच थोडे-फार आव्हान असेलच, शिवाय दवाचा होणारा परिणामही पाहावे लागेल, पण हे सर्व खेळाचा एक भाग आहे.’

स्वत:च्या अनुभवाविषयी गिलख्रिस्टने सांगितले की, ‘शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत मी एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळलोय. अशा प्रकाराचा सामना खेळणे नवा अनुभव असतो, पण यापेक्षा विविध खेळपट्ट्यांवर खेळणे सर्वात मोठे आव्हान असते.’ दिवस-रात्र कसोटीचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे सांगताना गिलख्रिस्ट म्हणाला की, ‘टी२० क्रिकेटमुळे खेळाची व्यवसायिकता उंचावत आहे, पण दिवस-रात्र कसोटीमुळे क्रिकेटची उत्सुकता वाढत आहे. मी सर्वच कसोटी सामने दिवस-रात्र खेळवा असे म्हणणार नाही, पण हा सकारात्मक प्रयोग असून यशस्वी होतोय.’ गिलख्रिस्टने यावेळी विराट कोहलीचे कौतुक करताना म्हटले की, ‘कोहली खूप सकारात्मक विचाराने खेळतो. तो कायम आपल्या कामगिरीने इतरांना प्रोत्साहित करतो. मानसिकरीत्या कणखर असल्याने त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होते.’

नो बॉल तिसºया पंचाने पाहावा!मंगळवारी आयपीएल संचालन परिषदेने आपल्या बैठकीत केवळ नो बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी चौथा पंच नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. याविषयीचे गिलख्रिस्टने म्हटले की, ‘मी या निर्णयाच्या विरोधात नाही, पण माझ्यामते नो बॉलकडे तिसऱ्या पंचाने लक्ष द्यावे. मैदानी पंचासाठी सुरुवातीला खेळपट्टीवर पाहणे, नंतर समोर पाहणे, याशिवाय आजूबाजूला लक्ष देणे, अशी वेगवेगळी आव्हाने असतात. यातूनच अनेकदा काही चुका होतात, पण यासाठी चौथ्या पंचाची गरज आहे, असे वाटत नाही. यासाठी तिसºया पंचाने रिप्ले पाहून निर्णय देणे उचित ठरेल, असे मला वाटते, पण जर चौथ्या पंचामुळे अधिक अचूकता येत असेल, तर या निर्णयाला माझा पाठिंबा असेल.’

टी२० क्रिकेट लॉटरीप्रमाणे!

संभाव्य टी२० विश्वविजेत्यांविषयी गिलख्रिस्टने म्हटले की, ‘टी२० विश्वविजयी संघाविषयी आताच भाष्य करणे कठीण आहे. कारण टी२० क्रिकेट एका लॉटरीप्रमाणे आहे. येथे कधी कोणता संघ बाजी मारेल, याविषयी ठामपणे सांगता येणार नाही, पण तरीही माझ्यामते पुरुषांच्या स्पर्धेत भारत, आॅस्टेÑलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, असे माझे भाकीत आहे. त्याचप्रमाणे, अव्वल टी२० संघ पाकिस्तानकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तसेच इतर संघांनाही गृहीत धरता येणार नाही. टी२० क्रिकेटमध्ये भाकीत वर्तविणे सर्वात कठीण आहे.’ 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ