- मतीन खानस्पोर्ट्स हेड- एव्हीपी लोकमत पत्रसमूह
सोशल मीडियावर मी एक कमेंट वाचली. कमेंट वाचून माझे क्रिकेटवरील प्रेम अधिक घट्ट झाले. ही कमेंट लॉर्ड्स कसोटीत शोएब बशीरच्या चेंडूवर दुर्दैवी त्रिफळाबाद झालेल्या मोहम्मद सिराजच्या खांद्यावर हात ठेवत धीर आणि शाबासकी देत असलेले इंग्लिश खेळाडू ज्यो रूट आणि झॅक क्रॉली यांच्याबाबत होती. या फोटोतील प्रसंग पाच दिवस चाललेल्या अटीतटीच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये झालेली ‘तू-तू-मैं-मैं’ आणि शेरेबाजी, एकमेकांना खुणावणारे प्रसंग आदी सर्व वादांना मूठमाती देणारा ठरला. खात्री पटली की हे आहे खरे क्रिकेट...
१९८३ च्या फायनलमधील तो प्रसंग...विरोधी खेळाडू केवळ भांडतात, असे नव्हे. अनेकदा त्यांच्यात मजेदार गप्पा रंगतात. सुनील गावसकर यांनी १९८३ च्या वन डे विश्वचषक फायनलचा मजेदार किस्सा सांगितला. विंडीजचा वेगवान गोलंदाज जोएल गार्नर हा उंचीचा लाभ घेत चेंडू टाकायचा. चेंडू बॅटवर उंचावरून यायचा. यामुळे गार्नरला ‘बर्ड’ची उपमा मिळाली.
फायनलमध्ये गावसकर हे गार्नरपुढे धावा काढू शकत नव्हते, त्याचवेळी लेगबायमुळे गावसकर नॉन स्ट्रायकरला पोहोचले आणि त्यांनी गार्नरला आठवण दिली की कौंटीत आपण सॉमरसेटसाठी खेळताना एकाच फ्लॅटमध्ये वास्तव्यास असतो. जुन्या मित्रासाठी तू एक कमकुवत चेंडू टाकू शकत नाहीस? यावर गार्नर म्हणाला, ‘नो मॅन, ही विश्वचषक फायनल आहे, यात कुठलीही गोष्ट मोफत मिळणार नाही.’
विजयाची चुरस निर्माण झाल्यावर एडरनलीन वाढते...खरे तर खेळाडूंमधील भावना चाहत्यांच्या संख्येत भर घालणारी ठरते. सामना आटोपताच दोन्ही संघांचे खेळाडू रांगेत येत हस्तांदोलन करणारे दृश्य सुखावणारे असते. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ मानला जातो. या खेळाला पाहण्याची मजाही तेव्हा येते, जेव्हा खेळाडू सभ्य भावनेचे दर्शन घडवितात. सामन्यात विजयाची चुरस निर्माण होताच खेळाडूंच्या शरीरातील एडरनलीनचा स्तर (राग किंवा उत्तेजकतेदरम्यान वाढणारे हार्मोन्स) वाढू लागतो. याचा परिणाम शेरेबाजी, डोळे दखविणे, खांद्याने धक्का देणे, विरोधी खेळाडूंविरुद्ध टोमणे मारणे आदी गोष्टींमध्ये होतो. हे सर्व प्रकार तोलामोलाच्या लढतीदरम्यान अनुभवायला मिळतो.
कोहली युगाची सांगता झाली; पण त्याच्या छायेत वाढलेले काही खेळाडू शेरेबाजीत निपुण बनले. स्वत: सिराज कमी आहे? लॉर्ड्सवर पाचही दिवस याची प्रचीती आली. पॅव्हेलियनमध्ये बदललेले इंग्लिश प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम तर, आपल्या खेळाडूंना भारतीयांविरुद्ध शेरेबाजीचा इशारा करताना दिसले. मॅक्युलमच का, भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर हेही जो रूट बाद झाल्यावर फारच उत्तेजित जाणवले. जिंकण्यासाठी तुमची केवळ देहबोली नव्हे, तर कामगिरीतील आक्रमकता गरजेची आहे; पण मने जिंकण्यासाठी ळभावनेचीच गरज असते.
विरोध केवळ सामन्यापुरता असायला हवा. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाच्या विजयाला दाद देणे हीच खरी खेळभावना! हेच खरे खेळातील सौंदर्य! बशीर बद्र साहेबांचा हा शेर अशाच प्रसंगासाठी आहे. ते लिहितात...‘दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे,जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों!’