देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित अन् लोकप्रिय स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील लढतींना सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या संघाकडून भारतीय संघातील स्टारही या स्पर्धेत मैदानात उतरले आहेत. या गर्दीत तमिळनाडूच्या संघाकडून खेळणाऱ्या आंद्रे सिद्धार्थनं 'छोटा पॅक बडा धमाका' असा सीन दाखवून दिला. १८ वर्षीय पोरानं चंदीगड विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. संघ अडचणीत असताना त्याने रणजी क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी ठोकली. या युवा क्रिकेटरचं थेट CSK शी कनेक्शन आहे. कारण आगामी हंगामात तो धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आंद्रे सिद्धार्थची दमदार सेंच्युरी
तमिळनाडू आणि चंडीगड यांच्यातील एलीट ग्रुप डी गटातील सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना तमिळनाडूच्या संघानं १२६ धावांत आघाडीच्या चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर आंद्रे सिद्धार्थ आणि बाबा इंद्रजीत या जोडीनं संघाचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. बाबा इंद्रजीत ४९ धावा करून परतल्यावर सिद्धार्थनं आपल्या भात्यातील फटकेबाजी कायम ठेवली. त्याने १४३ चेंडूत १०६ धावांची खेळी साकारली. यात त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. आंद्रे सिद्धार्थच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर तमिळनाडूनं पहिल्या डावात ३०१ धावा केल्या.
'छोटा पॅक बडा धमाका' करणाऱ्या खेळाडूसाठी CSK नं खेळला होता स्वस्तात मस्त डाव
रणजी करंडक स्पर्धेत तमिळनाडूकडून धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या आंद्रे सिद्धार्थ याच्यावर मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्सनं बोली लावली होती. अनकॅप्ड खेळाडूला ३० लाख रुपयासह चेन्नई सुपर किंग्सनं आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. धोनीच्या CSK शी कनेक्ट होतो तो खेळाडू धमाका करतो, हा इतिहास आहे. आंद्रे सिद्धार्थही या ट्रॅवरच आहे. त्याला CSK शी कनेक्ट झाल्याच कितपत फायदा मिळणार ते पाहण्याजोगे असेल. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील या भिडूशिवाय आंध्र संघाकडून खेळणाऱ्या शेख रशीद यानेही शतकी खेळी केली. या दोघांसाठी CSK फ्रँचायझी संघानं खास पोस्ट शेअर केली आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
आंद्रे सिद्धार्थनं आतापर्यंत ५ प्रथम श्रणी सामन्यात ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. यात चंदीगड विरुद्धच्या पहिल्या शतकासह ४ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३ सामन्यात २० च्या सरासरीने ४० धावा केल्या आहेत. रणजी करंडक स्पर्धेतील कडक खेळीमुळे प्रकाश झोतात आलेला खेळाडू आयपीएलमध्ये आणखी फेमस होऊ शकतो.