भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कॅन्सरशी संघर्ष सुरू असताना त्याने क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.. कॅन्सरवर मात करून त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि काही अविस्मरणीय खेळीही केल्या. कॅन्सरशी संघर्ष करताना आलेल्या अनुभवातून धडा घेत त्यानं YouWeCan या NGO ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून अनेक गरजूंना आर्थिक मदतही तो करतोय. कोरोना काळातही युवीने अनेकांसाठी मदतीचा हात पुढे केला. कोरोना काळात हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध होत नव्हते आणि युवीनं त्याच्या परीने काही हॉस्पिटन्सना बेड्स दिले.
आता कोरोनाची चौथी लाट येण्याची चर्चा सुरू आहे. अशात युवराज सिंगच्या YouWeCan या संस्थेनं पुन्हा पुढाकार घेतला आहे. युवीच्या सांगण्यावरून YouWeCan संस्थेनं गुरू गोविंद सिंह वैद्यकिय महाविद्यालय, फरीदकोट या हॉस्पिटल्सला १२० कर्टिकल केयर यूनिट बेड्स दिले आहेत. यासह संस्थेने असे १०० बेड्स लावण्याचा निर्धार केला आहे.
मागील वर्षी युवीनं चंडीगढ व मोहाली येथील हॉस्पिटल्सना बेड्स दिले होते. युवीनं २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. युवीने ४० कसोटींत १९०० धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकं व ११ अर्धशतकं आहेत. वन डे क्रिकेटमध्ये ३०४ सामन्यांत त्याच्या नावावर ८७०१ धावा असून १४ शतकं व ५२ अर्धशतकं आहेत. ५८ ट्वेंटी-२०त ११७७ धावा त्याच्या बॅटीतून आल्या आहेत. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा षटकार खेचून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता.