Oman Cricket Team, World Record: जगभरातील चाहत्यांच्या नजरा आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांकडे आहेत. पण दुसरीकडे, अल अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात एक विश्वविक्रम झाला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या ५४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार पाहायला मिळाला आहे. नामिबिया आणि ओमान यांच्यात एक वनडे सामना खेळला गेला. ओमानने हा सामना २ विकेट्सने जिंकला. पण या सामन्यादरम्यान ओमानने एक अद्भुत पराक्रम केला आणि विश्वविक्रम रचला.
ओमानचा विश्वविक्रम, फिरकीपटूंनी केला मोठा पराक्रम
ओमानने नामिबियाविरुद्ध प्रथम गोलंदाजी केली आणि पहिले षटक ऑफ-स्पिनर जय ओडेराने टाकले. त्याच्यासोबत डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज शकील अहमद दुसरीकडून गोलंदाजी करताना दिसला. या दोघांनी मिळून नामिबियाचे ६ बळी घेतले. त्यानंतर तिसरा फिरकीपटू आमिर कलीमनेही २ विकेट्स घेतल्या. याशिवाय, सिद्धार्थ बुक्कापट्टणम आणि समय श्रीवास्तव या दोन फिरकीपटूंनीही प्रत्येकी १ बळी टिपला. त्यामुळे संपूर्ण नामिबिया संघ ३३.१ षटकांत ९६ धावांवर ऑलआउट झाला. ओमान संघाने सामन्यात एकही वेगवान गोलंदाज वापरला नाही. नामिबियाच्या सर्व १० विकेट्स त्यांच्या फिरकीपटूंनीच घेतल्या. ओमान हा जगातील पहिला संघ ठरला, ज्याने वेगवान गोलंदाजाचा वापर न करता फिरकीपटूंच्या बळावर सर्व १० विकेट्स घेतल्या.
९७ धावांचा पाठलाग करताना ओमानचीही झाली दमछाक
ओमानला अवघ्या ९७ धावांचे लक्ष्य मिळाले होते पण ते लक्ष्य गाठण्यातही ओमानच्या संघाची दमछाक झाली. आमिर कलीम आणि जतिंदर सिंग यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण जतिंदर सिंग बाद होताच परिस्थिती बदलली. ४२ धावांवर पहिली विकेट गमावणाऱ्या ओमान संघाने काही वेळातच ७९ धावांवर ५ विकेट गमावल्या. यानंतर, ८७ धावांत ८ विकेट्स पडल्या. शेवटी, हशीर दफेदार आणि सिद्धार्थ यांनी संयमी फलंदाजी करत ओमानला विजय मिळवून दिला.