Join us  

क्रिकेटमुळे भारत-पाक संबंध सुधारतील; गेल्या महिनाभरापासून सीमेवर शांतता 

या घडामोडींवरून उभय देशांमधील क्रीडा संबंधांमध्येही एक प्रकारचा प्रतिध्वनी दिसून येईल. मार्चच्या सुरुवातीला तीन आठवड्यांच्या युद्धबंदीनंतर पाकिस्तानच्या ७ सदस्यांच्या अश्वारोहण संघाला नोएडामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी व्हिजा बहाल करण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 2:49 AM

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना लिहिलेल्या पत्रावरून सोशल मीडियामध्ये चर्चेला ऊत आला. भारत सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र रुटीन असल्याचे म्हटले आहे. या पत्रामुळे उभय देशांतील कटुता काही अंशी कमी झाली, अशी चर्चा आहे. मार्चच्या सुरुवातीला पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल कमर अहमद बाजवा यांनी केलेल्या वक्तव्यानुसार उभय देशांना भूतकाळ विसरून शत्रुत्व कमी करणे गरजेचे आहे.  ५-६ वर्षांनंतर महिनाभरापासून उभय देशांच्या सीमेवर शांतता आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान इम्रान खान यांना लिहिलेल्या पत्रानंतर भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दहशतवादी कारवायांचा केंद्रबिंदू अद्याप पाक असल्याचे म्हटले होते.  

या घडामोडींवरून उभय देशांमधील क्रीडा संबंधांमध्येही एक प्रकारचा प्रतिध्वनी दिसून येईल. मार्चच्या सुरुवातीला तीन आठवड्यांच्या युद्धबंदीनंतर पाकिस्तानच्या ७ सदस्यांच्या अश्वारोहण संघाला नोएडामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी व्हिजा बहाल करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अन्य देशांच्या तुलनेत भारताला क्रीडा स्पर्धांचे यजमानपद सोपविण्यास नकार दर्शविल्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांकडे अन्य पर्याय नव्हता. पाकच्या खेळाडूंना व्हिजा देण्याचा केवळ देखावा निर्माण करण्यात आलेला नसून यावेळी खरेच उदात्त हेतू आहे.

गेल्या आठवड्यात टेनिस दुहेरीतील खेळाडू रोहन बोपन्ना व असामुल हक कुरेशी ही ‘इंडो-पाक एक्स्प्रेस’  जोडी जवळज‌वळ ७ वर्षांच्या कालावधीनंतर एटीपी सर्किटमध्ये एकत्र खेळताना दिसली. भारत- पाकदरम्यान द्विपक्षीय खेळ सुरू होतील, अशी केवळ आशा बाळगू शकतो. यासाठी उभय देशातील राजकारणी आणि शासकांनी मनावर घ्यायला हवे. यावेळी तरी उभय देशातील क्रीडासंबंध पूर्ववत होतील, असे म्हणणे धाडसाचे ठरेल; पण पूर्वेतिहास पाहता ते अशक्यही नाही. त्यासाठी दोन्हींकडून राजकीय इच्छाशक्ती हवी आहे.

२००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर २०१२-१३ ला पाक संघ भारत दौऱ्यावर येऊन गेला. आताही नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना दहशतवादावर कुठलाही समझोता होणार नसल्याचे ठणकावून सांगितले.खेळ व्हायचे असतील तर राज्यकर्त्यांनी खेळांना खुल्या दिलाने परवानगी बहाल करणे महत्त्वाचे आहे.  उभय देशात वेळोवेळी चर्चेची दारे खुली होतात, मग खेळ सुरू व्हायला काय हरकत आहे. 

उपखंडात क्रिकेट लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याने दोन्ही देशांतील चाहत्यांच्या भावना जुळल्या आहेत. यामुळे तणाव विकोपाला जातो; पण क्रिकेटमुळेच भारत- पाक खेळ पूर्ववत होऊ शकतील, हेदेखील सत्य आहे. १९६१ ला स्थगित झालेले उभय देशातील खेळ १९७१ ला जनता सरकार सत्तेवर येताच सुरू झाले होते. कारगिल युद्धाच्या चार वर्षांनंतर २००४ ला अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारने भारतीय संघाला पाक दौऱ्यावर जाण्याची परवानगी बहाल केली. तो दौरा फारच अविस्मरणीय ठरला.

टॅग्स :भारतपाकिस्तान