अमरावती : मॉर्निंग चषक २०१९ चा मानकरी अकोल्याचा अरहान इलेव्हन हा संघ ठरला. त्यांनी अमरावती सुपर थर्टी या संघाचा अटीतटीच्या लढतीत दोन गडी राखून पराभव केला. अजिंक्य देशमुख हा मालिकावीर ठरला. अमरावती येथे रुरल इन्स्टिट्यूटच्या मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा पार पडली.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२१ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी संघ व मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या मॉर्निंग चषक २०१९ अंतर्गत १९ ते २९ डिसेंबर दरम्यान सामने झाले. स्पर्धेचा विजेता अरहान इलेव्हन हा संघ ठरला. त्यांना रोख ७१ हजार व चषक अशा स्वरूपातील दादासाहेब काळमेघ स्मृती प्रथम पुरस्कार श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांच्यातर्फे देण्यात आला. रोख ३१ हजार व चषक असा एम.आर. देशमुख (काजळीकर) स्मृती द्वितीय पुरस्कार हेमंत देशमुख यांच्यातर्फे अमरावती सुपर थर्टी या संघाला देण्यात आला. १५ हजार व चषक असा मधुकर सगणे स्मृत्यर्थ तृतीय पुरस्कार संदीप सगणे यांच्याकडून रॉयल अकोला संघाला तसेच रोख १० हजार व चषक असा चतुर्थ पुरस्कार अमरावतीच्या जे.बी.सी. संघाला रुपेश भोंड यांच्याकडून मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अमरावती सुपर थर्टीचा अष्टपैलू खेळाडू अजिंक्य देशमुख हा मालिकावीर, तर बाबू चौधरी उत्कृष्ट फलंदाज व अभिजित थेरे उत्कृष्ट गोलंदाज ठरला. प्रारंभी अखिल भारतीय विद्यापीठ संघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमरावती येथील क्रिकेट प्रशिक्षक विनोद कपिले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गुवाहाटी येथे राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया २०१९ मध्ये सुवर्णपदक मिळविणारी भक्ती काळमेघ व यंदाच्या राष्ट्रीय स्तरावर सिलेक्ट झालेली दीप्ती काळमेघ हिचासुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रशांत चांदूरकर यांनी केले.