Cricket Fights Viral video: क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल काहीही सांगता येत नाही. काही वेळ प्रतिस्पर्धी संघामधील खेळाडूंची मैत्री वाहवा मिळवून जाते. तर काही वेळी क्रिकेटला लाजवेल अशा काही घटना मैदानावर पाहायला मिळतात. क्रिकेट हा जेंटलमन्स गेम म्हणजेच सभ्य माणसांचा खेळ मानला जातो. पण सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे या खेळातील सभ्यता कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. भरमैदानात प्रतिस्पर्धी संघांचे दोन खेळाडू एकमेकांना भिडले आणि त्यांच्या हाणामारीही झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.
कुठे घडला हा प्रकार?
इर्मजिंग संघांमध्ये सध्या सामने सुरु आहेत. नव्या दमाचे उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेतून शोधले जातात आणि त्यातून पुढे चांगले खेळाडू वरिष्ठ पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करतात. अशाच एक सामन्यात दक्षिण आफ्रिका इमर्जिंग आणि बांगलादेश इमर्जिंग या दोन संघांचा सामना रंगला होता. बांगलादेशचा फलंदाज रिपॉन मोंडल आणि आफ्रिकेचा गोलंदाज शेपो नटुली यांच्यात हा राडा झाला. रिपॉनने फलंदाजी करताना षटकार लगावला आणि तो आपल्या बॅटिंग पार्टनरकडे जात असताना गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात नजरानजर झाली.
प्रकरण आणखी वाढलं...
एकमेकांनी खुन्नस दिल्यानंतर मग प्रकरण चिघळले. दोघे एकमेकांवर चाल करून गेले. इतर खेळाडू आणि पंच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनाही राग अनावर झाला त्यामुळे आधी धक्काबुक्की सुरु झाली. त्यानंतर लगेच थोडीशी हाणामारीही झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या दोघांवर काय कारवाई झाली याची अद्याप माहिती मिळालेली नाही.