Join us  

IPL 2020 - क्रिकेटप्रेमींचे लक्ष यूएईकडे..!

स्पर्धेच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नसून सुमारे ५३ दिवसांमध्ये आयपीएलचे आयोजन होईल. बदलांविषयी बोलायचे झाल्यास सामन्यांच्या वेळेमध्ये बदल झाला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 3:10 AM

Open in App

यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर यादम्यान आयपीएल होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. स्पर्धेच्या तयारीचा वेगही आता वाढला असून, बीसीसीआयकडे आता फार वेळ शिल्लक राहिलेला नाही. सर्व फ्रेंचाईजींनाही कळविण्यात आले आहे. आता कोणता संघ सर्वांत आधी पोहोचणार? कोणत्या संघाचा सराव कधी आणि कुठे होणार? अशा बातम्या रोज क्रिकेटप्रेमींना मिळत राहतील. एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले, तर दुसरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आयपीएलचे आयोजनही निश्चित झाले आहे. यूएईमध्ये कोरोनाची परिस्थितीही बऱ्यापैकी नियंत्रणात आली असल्याने आयपीएल आयोजनात फार अडचण येईल असे दिसत नाही.

स्पर्धेच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नसून सुमारे ५३ दिवसांमध्ये आयपीएलचे आयोजन होईल. बदलांविषयी बोलायचे झाल्यास सामन्यांच्या वेळेमध्ये बदल झाला आहे. भारतीय वेळेनुसार सामन्यांना सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. एरवी भारतामध्ये आयपीएल असताना सामने रात्री ८ वाजता सुरू व्हायचे. दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्येक फ्रेंचाईजीला २४ खेळाडूंना सोबत नेण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे भारतातील अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळू शकते. तिसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर एखादा खेळाडू कोरोनाग्रस्त झाला, तर त्याच्या जागी बदली खेळाडूचा पर्याय सर्व संघांना मिळाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये याआधी अशा प्रकारचे बदल करण्यास मुभा होती; मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अशी मुभा नव्हती. परंतु, यंदा आयपीएलमध्ये बदली खेळाडूंचा पर्याय ठेवण्यात आला आहे.स्पर्धेच्या प्रायोजकांविषयी म्हणायचे झाल्यास, मुख्य प्रायोजक म्हणून ‘विवो’ला कायम ठेवण्यात आले आहे. यावरून आधी खूप चर्चाही रंगल्या. भारतात जेव्हापासून चिनी वस्तू, अ‍ॅपविरुद्ध आवाज उठला गेला, तेव्हापासून भारतीय क्रिकेटमध्ये प्रायोजक असलेल्या या चिनी कंपनीच्या प्रायोजकत्वावर प्रश्न निर्माण झाले होते. मात्र सध्यातरी बीसीसीआयने विवोला कायम ठेवले आहे. जोपर्यंत भारत सरकारकडून आम्हाला सूचना येत नाही, तोपर्यंत करार कायम ठेवू. करारातून पैसा चीनकडून भारताकडे येत असल्याचे बीसीसीआयचे मत आहे. 

टॅग्स :आयपीएलभारतीय क्रिकेट संघ