आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये झालेल्या हायव्होल्टेज वादामुळे आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकामध्ये भारत-पाकिस्तान भिडणार नाहीत, अशीच खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी वेळापत्रकातच मोठा बदल करण्यात आला आहे.
क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यांना ग्रुप स्टेजमध्ये स्थान न देण्याचा निर्णय ICC ने घेतला आहे. क्रिकेट खेळाचे भविष्य सुरक्षित ठेवणे आणि स्पर्धेतील केवळ याच एका सामन्यावर होणारे अतिरिक्त लक्ष केंद्रीकरण थांबविण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे.
आयसीसीच्या अनेक स्पर्धांत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतात. परंतू, यापुढे आयसीसी हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांसोबत खेळणार नाहीत, याची काळजी घेणार आहे. यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये ICC जाणूनबुजून दोन्ही संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवत असे, ज्यामुळे स्पर्धेला सुरुवातीलाच मोठी प्रसिद्धी मिळत असे. हे आता टाळण्यात आले आहे.
राजकीय तणाव टाळणे
दोन्ही देशांमधील सध्याचा राजकीय तणाव पाहता, युवा स्तरावरही अनावश्यक सुरक्षा व्यवस्था आणि राजकीय चर्चा टाळणे हा यामागचा उद्देश आहे.
केवळ एका सामन्यावर लक्ष केंद्रित न होता, अन्य संघांना आणि स्पर्धात्मक क्रिकेटला अधिक महत्त्व देणे.
आयसीसी अशी रचना करणार आहे की दोन्ही संघ आपोआप वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जाणार आहेत. यामुळे, क्रिकेट चाहत्यांना आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा रोमांचक सामना पाहण्यासाठी स्पर्धेतील पुढील महत्त्वाच्या टप्प्यांपर्यंत, म्हणजेच सुपर सिक्स, सेमी-फायनल किंवा फायनलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.