- अयाझ मेमन
यजमान इंग्लंडच्या कामगिरीमध्ये झालेली घसरण पाहून अनेकांना धक्का बसला. स्पर्धेच्या सुरुवातीला हा संघ अत्यंत मजबूत दिसत होता आणि त्यांनी त्याप्रमाणे दमदार सुरुवातही केली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडने आपल्या गेल्या काही सामन्यांत सलग विजयांची मालिका गुंफली होती, पण जेव्हा कधी आपल्या संघाबाबत विश्वास असतो की, आपण कोणालाही पराभूत करू शकतो. तेव्हा कुठेतरी अतिआत्मविश्वास येतो आणि हेच काहीसे इंग्लंडच्या बाबतीत झाले, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. याशिवाय इंग्लंडने जे दोन्ही सामने गमावले (पाकिस्तान व श्रीलंका), ते दोन्ही सामने धावांचा पाठलाग करताना गमावले आहेत. याचा अर्थ, धावांचे लक्ष्य देण्यात इंग्लंड माहीर आहे, पण धावांचा पाठलाग करताना येणाऱ्या दबावाचा सामना करण्यात इंग्लंड संघ अपयशी ठरत आहे. त्यामुळे सध्या यजमान संघ दबावात असल्याचे स्पष्ट आहे.
दुसरीकडे क्रिकेटचाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामन्याचे वेध लागले आहेत. पाक संघाने उपांत्य फेरी गाठली, तर पुन्हा एकदा हा ‘हायव्होल्टेज’ सामना होऊ शकतो. भारताविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर पाकचा खेळ सुधारला आहे. पाकिस्तानने अनुभवी आणि तज्ज्ञ फलंदाज हॅरीस सोहेलला अंतिम संघात स्थान दिले, जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरला. पाकिस्तानची गोलंदाजी मजबूत आहे, पण त्या तुलनेत फलंदाजी थोडी कमजोर भासत होती.
फखर झमान, बाबर आझम, हॅरीस सोहेल हे फलंदाज चमकले, तर पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात नक्की यश मिळेल, पण असे असले, तरी त्यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा अद्याप धूसर आहेत. त्यांना केवळ उर्वरित सर्व सामने जिंकायचे नसून, इतर संघांच्या पराभवासाठी प्रार्थनाही करायची आहे. शिवाय पाकिस्तानला सर्व विजय मोठ्या धावगतीने मिळवायचे आहेत.
भारतासाठी सध्या मोठी चिंता आहे, ती भुवनेश्वर कुमारची दुखापत. ताणलेल्या मांसपेशी ठीक होणे हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असते. त्याचबरोबर, मानसिकरीत्या स्वत:ला कितपत तंदुरुस्त मानता हेही महत्त्वाचे आहे. कारण जरी शारीरिकदृष्ट्या खेळाडू तंदुरुस्त झाला, पण मानसिकरीत्या तो स्वत:ला तंदुरुस्त मानत नसेल, तर याचा परिणाम कामगिरीवर होऊ शकतो. एकूणच तो खेळू शकेल की नाही, हे आता डॉक्टर्सच्या अहवालावरच अवलंबून आहे.