लंडन : क्रेग ओव्हर्टन व मार्कस ट्रेस्कॉटीच यांनी गुरूवारी अनोखी हॅटट्रिक नावावर नोंदवली. या जोडीने समरसेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना या जोडीने नॉटिंगहॅमशायर क्लबविरूद्ध ही कामगिरी केली. ओव्हर्टनने सलग तीन चेंडूत बाद केलेल्या फलंदाजांचे झेल ट्रेस्कॉटीचने झेलले. 1914नंतर इंग्लंमध्ये प्रथमच अशी हॅटट्रिक नोंदवण्यात आली आहे.
लंडनमध्ये सुरू असलेल्या कौंटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेच्या पहिल्या विभागीय सामन्यात समरसेटच्या पहिल्या डावातील 463 धावांचा पाठलाग करताना नॉटिंगहॅमशायर क्लबचा पहिला डाव 133 धावांवर गडगडला. डावाने पराभव टाळण्यासाठी पुन्हा मैदानावर उतरलेल्या नॉटिंगहॅमशायरने 3 बाद 119 धावा केल्या होत्या. 41व्या षटकात ओव्हर्टनला पाचारण करण्यात आले. त्याने 49 धावांवर खेळत असलेल्या सलामीवीर बेन स्लॅटरला दुसऱ्या स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले.
त्यानंतर पुढील दोन चेंडूवर समित पटेल आणि रिकी वेस्सेल्स यांनाही माघारी पाठवत ओव्हर्टनने हॅटट्रिक पूर्ण केली. विशेष म्हणजे हे तीनही झेल ट्रेस्कॉटीचने टिपले. नॉटिंगहॅमशायरचा संपूर्ण संघ 184 धावांत तंबूत परतला आणि समरसेटने हा सामना एक डाव आणि 146 धावांनी जिंकला. यापूर्वी 1914 साली नॉर्थम्प्टनशायर क्लबच्या सिडनी स्मिथने हॅटट्रिकची नोंद केली होती आणि त्यावेळी जॉर्ज थॉम्पसनने तीनही झेल टिपले होते.