Join us  

२०व्या षटकात वादळ! २४ धावा चोपून झिम्बाब्वेचा थरारक विजय, श्रीलंकेची उडाली झोप

SL vs ZIM T20I : झिम्बाब्वेने मंगळवारी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रोमहर्षक विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 5:37 PM

Open in App

SL vs ZIM T20I : झिम्बाब्वेने मंगळवारी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रोमहर्षक विजयाची नोंद केली. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत झिम्बाब्वेने अखेरच्या षटकात विजय खेचून आणत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर चरिथ असलंकाची ३९ चेंडूत ६९ धावांची खेळी व्यर्थ गेली कारण झिम्बाब्वेने चालू असलेल्या श्रीलंका दौऱ्यातील पहिला विजय मिळवला. यजमानांना दुसऱ्या सामन्यात चार विकेट्सने पराभूत करत तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले आणि पहिल्या ५ षटकांत त्यांचे ४ फलंदाज २७ धावांत माघारी परतले. ब्लेसिंग मुजाराबानीने दोन धक्के दिले. चरिथ असलंका व अँजेलो मॅथ्यूज यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना श्रीलंकेला ६ बाद १७३ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. असलंकाच्या ६९ धावांच्या खेळीत ५ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे. मॅथ्यूजने ५१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६६ धावा केल्या. ल्युक जाँगवेने दोन विकेट्स घेतल्या.  

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेच्या सलामीच्या जोडीने आक्रमक खेळ केला. पण, तिनाशे कमुन्हूकाम्वे ( १२) याला दिलशान मधुशंकाने माघारी पाठवले. क्रेग एर्विन एका बाजूने फटकेबाजी करत राहिला. त्याने पहिल्या १० षटकांत ३४ चेंडूंत ३८ धावाच केल्या होत्या, परंतु नंतर त्याने धावांची गती वाढवली. त्याने ५४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७० धावा केल्या. ब्रायन बेन्नेट ( २५) बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेची मधली फळी अडखळली. 

शेवटच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज असताना ल्युक जाँग्वे व क्लाईव्ह मदाने ही जोडी मैदानावर होती. मॅथ्यूजने पहिलाच चेंडू नो बॉल टाकला आणि जाँग्वेने त्यावर षटकार खेचला.  त्यानंतर फ्री हिटवर चौकार मारून जाँग्वेने ५ चेंडू ९ धावा असा सामना आणला. दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर चौथ्या चेंडूवर १ धाव जाँग्वेने घेतली. २ चेंडूंत २ धावा असा सामना असताना मदानेने षटकार खेचून झिम्बाब्वेचा विजय पक्का केला. 

  

 

टॅग्स :झिम्बाब्वेश्रीलंकाटी-20 क्रिकेट