Cheteshwar Pujara, Mohammad Rizwan : खराब फॉर्मामुळे भारताच्या कसोटी संघातून स्थान गमावणाऱ्या चेतेश्वर पुजाराची ( Cheteshwar Pujara ) बॅट कौंटी क्रिकेटमध्ये चांगलीच तळपलेली पाहायला मिळतेय. ससेक्स क्लबकडून ( Sussex ) खेळणाऱ्या पुजाराने कौंटी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात द्विशतक ( २०१* वि. डर्बीशायर), दुसऱ्या सामन्यात शतक ( १०९ वि. वॉर्करशायर) झळकावल्यानंतर त्याने शनिवारी डरहॅम ( DURHAM ) विरुद्ध द्विशतकी खेळी केली. या सामन्याच्या निमित्ताने India-Pakistan चे फलंदाज चेतेश्वर पुजारा व मोहम्मद रिझवान एकत्र खेळले आणि दमदार कामगिरी करून इंग्लिश गोलंदाजांना पुरून उरले.
डरहॅमचा पहिला डाव २२३ धावांवर गुंडाळल्यानंतर ससेक्सचा संघ मैदानावर उतरला. पण, सलामीवीर अली ओर ( २७) व मॅसोन क्रेन ( १३) हे माघारी परतल्यानंतर कर्णधार टॉम हैनेस ( ५४) व टॉम अल्सोप ( ६६) यांनी डाव सावरला. ही दोघंही माघारी परतल्यानंतर पुजारा नांगर रोवून उभा राहिला. त्याला टॉम क्लार्कची ( ५०) सुरेख साथ मिळाली. त्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि पुजारा या जोडीनं कमाल केली. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध कितीही ताणले गेले असले तरी इंग्लंडमध्ये या दोघांनी एकत्र येत इंग्रजांची धुलाई केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावा जोडल्या. रिझवान ७९ धावांवर माघारी परतला.
पुजारा खिंड लढवताना दिसला. त्याने ३३४ चेंडूंत २४ चौकारांसह २०३ धावांची खेळी केली. ससेक्सचा डाव ५३८ धावांवर संपुष्टात आला आणि त्यांनी पहिल्या डावात ३१५ धावांची आघाडी घेतली.