Join us  

coronavirus: महिला वन डे, पुरुष अंडर १९ विश्वचषकाची पात्रता फेरी स्थगित

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२१ चा महिला विश्वचषक तसेच २०२२ च्या पुरुष अंडर १९ विश्वचषकासाठी आगामी जुलैमध्ये होणारी पात्रता फेरी स्थगित करण्याचा मंगळवारी निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 6:05 AM

Open in App

दुबई : आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२१ चा महिला विश्वचषक तसेच २०२२ च्या पुरुष अंडर १९ विश्वचषकासाठी आगामी जुलैमध्ये होणारी पात्रता फेरी स्थगित करण्याचा मंगळवारी निर्णय घेतला.महिलांची पात्रता फेरी श्रीलंकेत ३ ते १९ जुलै होणार होती. त्यात यजमान श्रीलंकेसह बांगलादेश, आयर्लंड, नेदरलॅन्ड, पाकिस्तान, पापुआ न्यूगिनी, थायलंड, अमेरिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे आदी दहा देशांचा सहभाग होता. सर्व सदस्य देश, त्यांचे सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला घेतल्यानंतर आयसीसी महिला वन डे विश्वचषकाची पात्रता फेरी तसेच आयसीसी अंडर १९ पुरुष क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरी २०२२ ची पात्रता फेरी स्थगित करण्यात येत असल्याचे आयसीसीने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. अंडर १९ पात्रता फेरीची सुरूवात २४ ते ३० जुलै या कालावधीत डेन्मार्कमध्ये होणाºया युरोपियन क्षेत्र पात्रता फेरीसोबतच होणार होती. या स्पर्धेचे आयोजन पुन्हा कधी करावे याचा निर्णय सहभागी देशांसोबत चर्चा केल्यानंतरच होईल, असे सांगण्यात आले. आयसीसीचे स्पर्धा प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले, ‘प्रवासाबाबत निर्बंध काय आहेत. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश, संबंधित देशांचे सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर दोन्ही पात्रता स्पर्धा स्थगित करण्याचा आम्ही निर्णय घेतला. संकटाच्या काळात खेळापेक्षा खेळाडू, कोचेस, अधिकारी, चाहते आणि संपूर्ण क्रिकेट समुदायाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. खेळ नंतरही आयोजित करू शकतो.’याशिवाय आयसीसी अंडर १९ विश्वचषकासाठी क्षेत्रीय पात्रता फेरीचीदेखील समीक्षा करण्यात येत आहे. आफ्रिकास्तर पात्रता फेरीचे आयोजन ७ ते १४ आॅगस्ट या कालावधीत टांझानिया येथे तर आशिया विभाग पात्रता फेरी १ ते ९ डिसेंबर या कालावधीत थायलंडमध्ये होणार आहे. सर्व पाचही क्षेत्रांतील पात्र संघांची प्रमुख फेरी २०२१ मध्ये आयोजित केली जाईल, असे आयसीसीने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आयसीसीआंतरराष्ट्रीय क्रिकेट