नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कोविड -१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. एका खासगी वाहिनीसोबत बोलताना हे दिग्गज क्रिकेटपटू म्हणाले, क्रिकेट आता कठीण झाले आहे. खेळाडूंना मास्क घालून खेळताना बघणे अजब वाटेल. आता मैदानावर खेळाडूंचा जल्लोष बघायला मिळणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्साह संचारत होता. क्रिकेट आता पूर्णपणे सॅनिटाईझ होईल.’
एका उत्तरात हे माजी भारतीय खेळाडू म्हणाले, ‘कोरोनानंतर ज्यावेळी क्रिकेट पुन्हा सुरू होईल त्यावेळी चेंडूबाबत प्रत्येक खेळाडूच्या मनात वेगळी भीती राहील. सामन्यापूर्वी प्रत्येकाची कोरोना चाचणी होईल. आता जर या संक्रमणामुळे कुणी खेळाडू बाहेर झाला तर बदली खेळाडू घेता येईल.’
गावस्कर पुढे म्हणाले, ‘जर खेळाडू मास्क घालून खेळतील तर ते मी बघू शकणार नाही. हेल्मेटमध्येच खेळाडूंना ओळखताना अडचण येत होती. आता मास्क येईल तर अडचण आणखी वाढेल.’ (वृत्तसंस्था)
आॅक्टोबरपर्यंत क्रिकेट कठीणच
क्रिकेटच्या भविष्याबाबत बोलताना गावस्कर पुढे म्हणाले, ‘कोविड-१९ च्या इफेक्टबाबत कुणालाच काही कल्पना नाही. क्रिकेटसाठी ही मोठी कठीण वेळ आहे. आॅक्टोबरपर्यंत क्रिकेट खेळणे कठीण असेल. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजदरम्यानची मालिका बघितल्यानंतर पुढे क्रिकेट कसे राहील, याची कल्पना येईल.’