नागपूर : कोरोनाचा फटका अनेकांना बसला. क्रीडाविश्व ठप्प झाले. खेळाडूंचा सराव बंद असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अडथळे येत आहेत. कोरोनाने ऑस्ट्रेलियाच्या सात क्रिकेटपटूंच्या ‘लग्नात विघ्न’ आणल्याचे वृत्त काही दिवसांआधी प्रकाशित झाले होते. आता विदर्भाच्या तीन क्रिकेटपटूंचे शुभमंगलदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडले आहे.
या तीन खेळाडूंमध्ये अष्पैलू आदित्य सरवटे, यष्टिरक्षक-फलंदाज अक्षय वाडकर आणि वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी यांचा समावेश आहे. या तिघांनी विदर्भ संघाला सलग दोनदा रणजी आणि इराणी करंडक चॅम्पियनशिपचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला, हे विशेष. आदित्यचे शुभमंगल २७ एप्रिलला ठरले होते. अक्षय वाडकर आणि गुरबानी यांचे लग्न क्रमश: २ मे आणि १८ मे रोजी ठरले होते.
विदर्भ संघाचा भेदक लेगस्पिनर आदित्य सरवटे आणि त्याची होणारी पत्नी अरुणिता यांनी अत्यंत साधेपणाने आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतात त्यामुळे लग्नाच्या तयारीलादेखील खूप पूर्वीपासून प्रारंभ झाला होता.
अक्षय वाडकर आणि त्याची भावी वधू श्रुतिका यांना स्वत:चा विवाह सोहळा अविस्मरणीय बनवायचा आहे. त्यांनी त्यादृष्टीने धूमधडाका करण्याचा विचार सुरू केला होता. पण आता भविष्यातील योजना आखण्याशिवाय पर्याय नाही. नव्या तारखेसाठी प्रतीक्षा सुरू आहे.
शिवानी हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार असलेला वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीने विवाहाच्या नव्या तारखेबाबत मात्र ‘वेट अॅन्ड वॉच’ अशी भूमिका घेतली. वडील नरेश गुरबानी यांच्यानुसार नव्या तारखेचा निर्णय लवकरच होईल. घरच्या थोर मंडळींचा सल्ला घेतल्यानंतर लग्न कधी आटोपायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे.