सिडनी : कोरोना व्हायरस महामारीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे भारताविरुद्ध वर्षाच्या शेवटी चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका पाच सामन्यांची करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे.
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरमध्ये टी-२० तिरंगी मालिकेने सुरू होणार आहे आणि डिसेंबरमध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने संपणार आहे. दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा पूर्वघोषित कार्यक्रमानुसार १८ ऑक्टोबरला प्रारंभ होणार आहे, पण सध्याची स्थिती बघता याबाबत अनिश्चितता आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ केव्हिन रॉबर्टसन म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय सत्रावर झालेल्या प्रभावाचा विचार करता आमचे लाखो डॉलरचे नुकसान झाले आहे. आम्ही त्याची भरपाई करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहोत. आम्ही सर्व पर्यायांचा विचार करती आहोत.’
ते म्हणाले, ‘आमच्याकडे सध्या वेळ आहे. भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान विविध पर्यायांचा विचार केल्या जात आहे. सध्या आम्ही कुठलीेच शक्यता फेटाळलेली नाही.’ प्रेक्षकांविना टी-२० विश्वकप स्पर्धेच्या आयोजनावरही विचार होत आहे. ते पुढे म्हणाले, ‘यात आर्थिक लाभ होणार नाही, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सत्रासाठी हे आवश्यक आहे.’