मेलबोर्न : ‘कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या अडचणीच्या काळामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे पाहून थोडे आश्चर्य वाटत आहे. मात्र खेळाडू आणि क्रिकेट संघ एकजुटीने या संकटातून बाहेर येतील, असा विश्वास आहे,’ असे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेजलवूड याने सांगितले.
कोरोनामुळे क्रिकेट घडामोडी ठप्प पडल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) ३० जूनला समाप्त होणाऱ्या आर्थिक वर्षापर्यंत आपल्या ८० टक्के स्टाफला कामावरून काढून टाकले आहे. त्याच वेळी, ऑगस्टपर्यंत सीएकडे पगार देण्याइतपतही पैसे राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत हेजलवूड म्हणाला की, ‘सीएची ही स्थिती पाहून मी चकित झालो होतो, परंतु आता कोणतीही शंका नाही की या परिस्थितीचे परिणाम पाहण्यास मिळतील.’ त्यामुळेच आता आपणही कपात स्वीकार करत मानधन घेण्यास तयार असल्याचेही हेजलवूडने म्हटले.
हेजलवूड म्हणाला, ‘इतर खेळांप्रमाणे आम्ही वेगळ्या परिस्थितीत नाही. केवळ तुम्ही कधीपर्यंत या परिस्थितीचा सामना करू शकता यावर सर्वकाही अवलंबून आहे. जर पुढील उन्हाळ्यापर्यंत हीच स्थिती कायम राहिली, तर नक्कीच याचे परिणाम फार गंभीर होतील.’ दरम्यान, याआधी सीए आणि आॅस्टेÑलिया क्रिकेटर्स संघटना यांच्यात मानधनावरून वाद झाला होता. परंतु, तेव्हापासून संबंध सुधारले असून यावेळी या संकटाचा चांगल्या प्रकारे सामना करण्यात येईल, असा विश्वास हेजलवूडने व्यक्त केला. तो म्हणाला, ‘माझ्या मते, एसीए आणि सीए यांच्यातील संबंध आता बºयाच प्रमाणात चांगले झाले आहेत.’