नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे आधीच आयपीएलचे १३ वे सत्र १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले असताना आता सर्व संघांचे सराव सत्रही थांबविण्यात आले आहेत. स्पर्धा सुरु होण्याबाबत कोणतीही सूचना मिळेपर्यंत सर्व संघांचे सराव शिबीर थांबविण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांकडून मिळाली. त्यामुळेच आता काही खेळाडूंनी आपापल्या घरी परतण्याचा मार्गही पकडला आहे.
रॉयल चँलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघाने सोमवारी आपले सराव शिबीर रद्द केले. त्यांचे शिबीर २१ मार्चपासून सुरु होणार होते. त्याचप्रमाणे, चार वेळचे आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स, तीन वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) आणि दोन वेळचे चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या संघांनी याआधीच आपले सराव शिबीर रद्द केल्याचे जाहीर केले होते. सीएसकेने शनिवारीच आपले शिबीर रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यामुळेच आता बहुतेक क्रिकेटपटूंनी आपापल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आरसीबीने ट्वीटरद्वारे माहिती दिली की, ‘सर्व संघसहकाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने २१ मार्चपासून सुरु होणारे आरसीबीचे सराव सत्र पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. मंत्रालयाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे सर्वांनी पालन करावे याबाबत आम्ही सर्वांना आवाहन करतो.’ (वृत्तसंस्था)
बीसीसीआयचे ‘वर्क फ्रॉम होम’
कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने मुंबईतील आपले मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे सूचित केले आहे. याविषयी बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे मुंबईस्थित बीसीसीआय मुख्यालय बंद राहील याविषयी सर्व कर्मचाºयांना कळविण्यात आले. सर्वांना घरुन काम करण्यासाठी सांगण्यात आले आहे.’