पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पाकिस्तानातील गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे. कोरोना व्हायरसमुळे येथील बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन काम करत आहे आणि आतापर्यंत त्यांनी 2000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटल्या आहेत. शाहिद आफ्रिदीनं त्यांच्या या समाजकार्याची माहिती देणारं ट्विट केलं. त्यात त्यानं पाकिस्तानातील अल्पसंख्यांक म्हणजेच हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबीयांना मदत केल्याची माहिती दिली. एका हिंदू टेनिसपटूनं  पाकमधील अल्पसंख्यांकाना होत असलेल्या त्रासाबद्दल आफ्रिदीला कळवलं होतं. त्यानंतर आफ्रिदीनं मदतीचा हात पुढे केला.
आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉबीन दास यांनी शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला शहरातील अल्पसंख्यांकांना मदत करण्याची विनंती केली होती. कराची स्पोर्ट्स फोरमचे सचिन आसिफ अजीम यांनी सांगितले की,''जहांगीर खान हे फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मला फोन केला आणि दास यांच्या विनंतीबद्दल सांगितले.''
त्यानंतर आफ्रिदीनं ट्विट केलं की,''शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन पाकिस्तानातील गरजू अल्पसंख्यांकांना रेशन पुरवण्याचं काम करत आहे. कराची येथील हिंदू आणि ख्रिश्चन समाजाला आज रेशन पुरवण्यात आलं.''   
 
शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशननच्या या समाजकार्याचं हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी कौतुक केलं आहे.युवीनं ट्विट केलं की,''हा कसोटीचा काळ आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांची काळजी आपल्याला घ्यायची आहे. चला तर मग योगदान करूया.... मी शाहिद आफ्रिदी आणि त्याच्या फाऊंडेशनच्या समाजकार्याला सपोर्ट करतो. तुम्हीही त्याच्या समाजकार्यात मदत करा, असं आवाहनही करतो.''
यापूर्वी हरभजन सिंगनेही ट्विट करून आफ्रिदीला पाठिंबा दिला. त्यानं लिहिलं की,'' शाहिद आफ्रिदी आणि त्याचं फाऊंडेशन चांगलं काम करत आहेत. त्याच्या कार्यात आपणही हातभार लावूया आणि जमेल तशी मदत करूया...''