-अयाझ मेमन
कोविड -१९ नंतर मैदानावर चेंडू कसा हाताळायचा, यासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली. चेंडू स्विंग व्हावा यासाठी चेंडूची चकाकी कायम राखण्याकडे गोलंदाजांचा कल असतो. यासाठी क्षेत्ररक्षक व गोलंदाज आपला घाम किंवा थुंकीचा सर्रास वापर करतात. कोविड -१९ हा क्रिकेटमधील मोठा गेमचेंजर बनू शकतो. लाळ आणि घाम हे विषाणू वहनाचे सोपे साधन समजले जात आहे. त्यामुळे गोलंदाज, फलंदाज व पंचांनाही असुरक्षित वाटू शकेल.
को विड महामारीमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी व यातून काही मार्ग शोधता येतो का, हे पाहण्यासाठी आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेच्या कार्यकारिणीने १२ देशाांच्या प्रतिनिधींसह शुक्रवारी बैठक घेतली.
कोविड महामारीमुळे सर्वच देशातील क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे आयसीसीने २०२३ पर्यंतच्या क्रिकेट वेळापत्रकाची पुनर्मांडणी करण्यात येईल असे सांगितले या वर्षी आॅक्टोबर महिन्यात होणारी जागतिक टी-२० चॅम्पियनशिप ही स्पर्धा कशी भरवायची, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. मात्र कोरोनावर लवकरच मात केली जाईल, या आशेवर ही स्पर्धा अद्याप लांबणीवर टाकण्यात आलेली नाही. टी-२० वर्ल्ड चॅम्पियनशिपबरोबरच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ही आयसीसीची महत्त्वाची स्पर्धा आहे. कोरोनामुळे अनेक कसोटी मालिका रद्द कराव्या लागल्यामुळे, २०२१ मध्ये होणाऱ्या फायनलला काहीच अर्थ राहणार नाही.
चेंडूवर लाळ किंवा घाम लावण्यास गोलंदाजांना प्रतिबंध केला तर गोलंदाजांचे भवितव्यच धोक्यात येईल. मुळातच गोलंदाजावर असलेल्या अनेक बंधनांमुळे (उदा. क्षेत्ररक्षणाची मर्यादा, सपाट खेळपट्ट्या आदी.) क्रिकेटमध्ये फलंदाजांचेच वर्चस्व आहे. अशातच कोविडमुळे गोलंदाजांवर आणखी मर्यादा येऊ शकतात.चेंडूवर घाम किंवा थुंकी लावण्यास बंदी घालण्यास बहुतांश गोलंदाजांनी विरोध दर्शवला आहे. मात्र या महामारीच्या पार्श्वभूमीवर आयसीसीकडे दुसरा कोणताही उपाय दिसत नाही. या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीत आयसीसीच्या बैठकीत एक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार चेंडू तयार करताना त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट पदार्थ लावण्याची परवानगी द्यावी असे म्हटले आहे. मात्र असे करणे प्रचलित कायद्यानुसार प्रतिबंधित आहे व शिक्षेस पात्र आहे.
गोलंदाजांनी असे प्रयोग केले नाहीत असे नाही मात्र ते चोरून केले आहेत. लोखंडी खिळा, ब्लेड, पॉलिश पेपर्स, जेलीबिन्स, तेल याचा वापर करून चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झालेले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा अशा गोष्टी घडल्या आहेत. इंग्लंडने १९७६ मध्ये भारत दौरा केला होता. त्यावेळी वेगवान गोलंदाज जॉन लेव्हल याने चेंडूला चकाकी येण्यासाठी व्हॅसलिनचा वापर केला होता. याबाबतची तक्रार एमसीसीकडे करण्यात आली होती. मात्र त्यावेळी इंग्लंड क्रिकेट मंडळ शक्तिशाली असल्याने लेव्हलला फक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. पाकिस्तानचे सर्फराज, इम्रान, वकार व शोएब अख्तर रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चेंडूला चकाकी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असत. नुकतेच घडलेले एक प्रकरणही ताजेच आहे. दक्षिण आफ्रिका दौºयात आॅस्ट्रेलियाच्या वॉर्नर व स्टिव्ह स्मिथ यांनी चेंडूशी केलेल्या छेडछाडीमुळे त्यांच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली होती.