Asia Cup Rising Stars 2025 : आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' यांच्यातील सामना दोहा येथील वेस्ट अँण्ड पार्क इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ १३६ धावांत ऑलआउट झाला. भारतीय संघाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर Maaz Sadaqat याच्या नाबाद अर्धशतकीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने हा सामना ८ विकेट्सनं जिंकला. पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरलेल्या सदाकतच्या रिले कॅचवरुन मैदानात चांगलाच वाद झाला. तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरवल्यावर भारतीय संघातील खेळाडूंनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेहाल वढेरा आणि नमन धीर जोडीनं सीमारेषेवर कमालीचा ताळमेळ दाखवत पाकिस्तानच्या माझ सदाकत याने मारलेला फटका कॅचमध्ये बदलला. पण तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहून रिले कॅच अवैध ठरवत पाकिस्तानी बॅटरला नाबाद ठरवले. भारतीय 'अ' संघाचा कर्णधार जितेश शर्मासह संघातील खेळाडूंनी यावर आक्षेप घेतला. टीम इंडियाच्या खेळाडूंसह स्टाफ सदस्य सामनाधिकारी आणि पंचांसोबत या निर्णयावरुन हुज्जत घालताना दिसले. तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणामुळे सामना जवळपास पाच मिनिटे थांबवण्याची वेळ आली. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानच्या डावातील १० व्या षटकात भारताकडून सूयश शर्मा गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर सादाकतने मोठा फटका खेळला. नेहल वढेरा याने सीमारेषेवर चपळाई दाखवत चेंडू अडवला. त्याने चेंडू मैदानात फेकल्यावर नमन धीरनं कॅच पूर्ण केला. पण तिसऱ्या पंचांनी हा कॅच अवैध ठरवला. वढेराचा पाय सीमारेषेला लागला नसताना फलंदाजाला नाबाद कसा? भारतीय संघासोबत चिटिंग झाली का? असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण होऊ शकतो. पण तसं काही झालं नाही. नव्या नियमाच्या आधारावर पंचांनी पाकिस्तानी बॅटरला नाबाद ठरवलं.
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
काय सांगतो नियम?
पाकिस्तानी बॅटरचा मारलेला फटका कॅचमध्ये रुपांतरित करण्यासाठी वढेराने सीमारेषा ओलांडण्याआधी चेंडू मैदानात फेकला. नमन धीरने रॅली कॅच उत्तमरित्या पूर्णही केला. पण एमसीसी (Marylebone Cricket Club) च्या नव्या नियमानुसार, जर पहिला फील्डर सीमारेषेबाहेर गेला असेल आणि तो पुन्हा मैदानात परत आला नसेल तर दुसऱ्या फील्डरने कॅच पूर्ण केला, तरी देखील कॅच वैध मानला जाणार नाही, असा नियम आहे. त्यामुळेच पाकिस्तानी खेळाडू नाबाद राहिला.