नवी दिल्ली : नियंत्रित आक्रमकतेच्या बळावर बेन स्टोक्स वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत आत्मविश्वासाने इंग्लंडचे नेतृत्व करणार असल्याचा आशावाद मास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केला आहे. या सामन्यानिमित्त सचिन आणि ब्रायन लारा यांच्या आॅनलाईन अॅपवर गप्पा रंगल्या.
‘अनेकदा आघाडीवर राहून नेतृत्व करताना बेन स्ट्रोक्स याला पाहिले आहे. आक्रमक, सकारात्मक आणि बचावात्मक असे तिन्ही पवित्रे संघाच्या हितासाठी कधी घ्यायचे हे त्याला अवगत आहे. त्याचा आक्रमकपणा कमालीचा नियंत्रित असतो. मानसिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या या खेळाडूने स्वत:मध्ये मोठे बदल केले. मैदानावर त्याचा प्रभाव असल्यामुळे हा अष्टपैलू खेळाडू यशस्वी होईल, यात शंका नाही,’असे सचिनने सांगितले.
विंडीजची फलंदाजी महत्त्वाची-लारा
ब्रायन लारा याने ही मालिका इंग्लंडचा वेगवान मारा विरुद्ध विंडीजची फलंदाजी अशी गाजणार असल्याचे सांगून आमचे फलंदाज गोलंदाजांवर कसे वर्चस्व गाजवतात, यावर यश अवलंबून असल्याचे म्हटले आहे. ‘प्रत्येक गोलंदाजावर वर्चस्व गाजवण्याची गरज नाही. तुम्ही ७०-८० धावांवर खेळत असाल आणि एखादा गोलंदाज आक्रमक होऊन मारा करत असेल तर बॅकफूटवर आलात तरी चालेल. मी असे अनेकदा केले आहे.
दुसऱ्या टोकाहून मारा करणाºया गोलंदाजाला फटके मारण्याची किमया शोधून काढण्याची कला अवगत करावी लागेल. आक्रमक असलेला गोलंदाज ६-७ षटके टाकल्यानंतर आपोआप थकून जाईल, आणि तुम्ही मोठी खेळी करण्यात यशस्वी व्हाल, असे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो,’ असे विंडीजच्या फलंदाजांना उद्देशून म्हटले आहे.