Join us

माझा खेळ खराब करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय - मोहम्मद शामी

आपल्या पतीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असून, त्याने आपल्याला मारहाणही केल्याचा सनसनाटी आरोप मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ हिने केले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 15:35 IST

Open in App

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शामी विवाहबाह्य संबंधांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. आपल्या पतीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असून, त्याने आपल्याला मारहाणही केल्याचा सनसनाटी आरोप मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ हिने केले आहेत. तिने थेट फेसबुकवर काही तरुणींचे फोटो आणि स्क्रीनशॉट शेअर करत पतीचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आणले आहेत. मात्र मोहम्मद शामीने हे सर्व आरोप फेटाळले असून, आपलं करिअर संपवण्यासाठी कट रचला जात असल्याचा दावा केला आहे. 

मोहम्मद शामीने ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप शामीने केला आहे. ट्विटवर मोहम्मद शामीने लिहिलं आहे की, 'माझ्या खासगी आयुष्याबद्दल ज्या काही बातम्या सुरु आहेत, त्या सगळ्या खोट्या आहेत. हे माझ्याविरोधातील खूप मोठं षडयंत्र आहे. मला बदनाम करण्याचा आणि माझं करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे'.

भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ हिने शमीचे फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याच्यावर हे आरोप केले आहेत.  दरम्यान या प्रकारामुळे शामीचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर शामीचे काही तरुणींसोबतचे फोटो  पोस्ट करण्यात आले आहेत. त्या तरुणी शामीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आले आहेत. 

मोहम्मद शामी आणि हसीन जहाँचा 2014 मध्ये विवाह झाला आहे. दरम्यान ज्या अकाऊंटवरुन मोहम्मद शामीवर आरोप करण्यात आले आहेत ते अकाऊंट अधिकृत नाहीये. पोस्ट केल्यानंतर अकाऊंट बंद करण्यात आलं आहे.  

टॅग्स :मोहम्मद शामी