Join us  

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीचा होईल परिणाम

कसोटी मालिकेनंतर आता उत्सुकता लागली आहे ती एकदिवसीय मालिकेची. एकदिवसीय मालिकेत कोणता संघ मजबूत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 4:32 AM

Open in App

अयाझ मेमन

कसोटी मालिकेनंतर आता उत्सुकता लागली आहे ती एकदिवसीय मालिकेची. एकदिवसीय मालिकेत कोणता संघ मजबूत आहे हे सांगायचे झाल्यास, भारतीय संघ मला मजबूत दिसतो. कारण कसोटी मालिका जिंकलेली असल्याने भारतीयांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे; शिवाय ते विजयी लयीमध्ये आहेत. त्याचवेळी भारतापुढे काही अडचणीही आहेत. कारण एका वादग्रस्त प्रकरणामुळे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर निलंबणाची कारवाई झाली आहे. या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय संघ खूप कमजोर भासेल; कारण योग्य समतोल राहणार नाही. शिवाय रिषभ पंतचाही या मालिकेत सहभाग नाही.

आता हार्दिक खेळणार नसल्याने भारताला अष्टपैलू खेळाडूची कमतरता भासेल. ही कमतरता रवींद्र जडेजा भरून काढू शकतो. पण जर जडेजाला खेळविले, तर युझवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळेल. त्यामुळे योग्य ताळमेळ बसविण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाची परीक्षा लागेल. संघात महेंद्रसिंग धोनीची उपस्थिती नक्कीच मोलाची ठरेल. यात दुमत नक्कीच नाही. त्याचे यष्ट्यांमागील कौशल्य अप्रतिम आहे. त्याच्यासारखा उत्कृष्ट यष्टीरक्षक दुसरा कोणीही नाही. युवा रिषभ पंतला अद्याप यष्टीरक्षणात खूप सुधारणा करण्याची गरज आहे. शिवाय धोनीकडे खूप मोठा अनुभव आहे. धोनी खेळ खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. पण सहा महिन्यांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेकडे नजर ठेवून धोनीला आपला फलंदाजीचा फॉर्म मिळवणे खूप महत्त्वाचे आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आता प्रत्येक एकदिवसीय लढत रंगीत तालीम ठरेल. ऑस्ट्रेलिया दौºयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार. त्यामुळे या मालिका जिंकण्यासह विश्वचषक स्पर्धेसाठी तयारीही करण्याचे आव्हान भारतीय संघापुढे आहे. या दोन मालिकांनंतर आॅस्टेÑलिया भारतात एकदिवसीय मालिका खेळेल. पण विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघ व्यवस्थापन आॅस्टेÑलिया आणि न्यूझीलंड येथे आपल्या खेळाडूंची कामगिरी कशी होते याकडे अधिक लक्ष देईल. यानुसारच विश्वचषक स्पर्धेचा संघ तयार करण्यात येईल अशी मला आशा आहे.हार्दिक-राहुल प्रकरणाविषयी म्हणायचे तर मत व्यक्त करण्यावर कोणाला रोखू नये. काही ठिकाणी माझ्या वाचनात आले की, दोघांनी या कार्यक्रमात सहभागी होताना परवानगी घेतली नव्हती. पण माझ्या मते कोणाला बांधून ठेवता येणार नाही. बीसीसीआयची एक नियमावली आहे आणि त्याच्या मर्यादेत राहिले, तर कोणाला काहीच अडचण येत नाही. महत्त्वाचे म्हणजे त्या शोमध्ये जबाबदारीने वक्तव्य करायला पाहिजे होते. हार्दिकने महिलांवर केलेल्या वक्तव्याला मोठा विरोध झाला. यावरूनच हे प्रकरण चिघळले आणि बीसीसीआयनेही कारवाई केली. माझ्या मते या प्रकरणामुळे युवा खेळाडूंसह सर्वांनाच एक धडा मिळाला असेल. तुम्ही स्टार बनल्यानंतर जाहीरपणे कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होताना थोडं सांभाळून बोललं पाहिजे.

व्हिडीओसाठी पाहा

https://www.facebook.com/lokmat/videos(लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत)

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ