Join us

फलंदाजी प्रशिक्षकाच्या शर्यतीत आमरे

‘बीसीसीआय’कडे अर्ज दाखल : संजय बांगर यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 06:58 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाचे माजी फलंदाज प्रवीण आमरे हे राष्ट्रीय पुरुष संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या शर्यतीत कायम आहेत. आमरे यांच्यामुळे सध्याचे कोच संजय बांगर यांना तगडे आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दर्बन येथे द. आफ्रिकेविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकाविणाऱ्या आमरे यांनी या पदासाठी अर्ज केला आहे. आमरे यांनी भारतासाठी ११ कसोटीत एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ४२५ धावा केल्या आहेत. त्यांनी ३७ एकदिवसीय सामन्यांत दोन अर्धशतकांसह ५१३ धावा ठोकल्या.

सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर हे विश्वचषकादरम्यान चुकीच्या कारणासाठी चर्चेत आले होते. उपांत्य सामन्यात धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याचा निर्णय बांगर यांनी घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे प्रवीण आमरे हे बांगर यांच्या जागेसाठी तगडे उमेदवार मानले जात आहेत. विश्वचषक स्पर्धेपूर्वी वर्षभर भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज शोधमोहीम सुरू होती. उपांत्य फेरीच्या सामन्यात आघाडीचे तीन फलंदाज परतल्यानंतर डाव कोलमडला होता. प्रवीण आमरे यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले असून, आयपीएलमध्येही ते दिल्ली संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. रमाकांत आचरेकर यांचे शिष्य असलेले आमरे यांच्याकडून भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा नेहमी टिप्स घेत असतो. याव्यतिरिक्त आमरे यांनी सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंनाही फलंदाजीचे धडे दिले आहेत. आमरे यांच्या मार्गदर्शनात मुंबईने रणजी करंडक जिंकला असून, सध्या ते अमेरिकेच्या क्रिकेट संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. बीसीसीआयने मुख्य कोच, फलंदाजी कोच आणि गोलंदाजी कोचसह अन्य पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्याचे फलंदाजी कोच बांगर यांचा करार विंडीज दौºयापर्यंत लांबविण्यात आला असला तरी, यानंतर त्यांना मुदतवाढ देण्याची इच्छा नसल्याचे संकेत आहेत. 

टॅग्स :क्रिकेट सट्टेबाजीबीसीसीआय