नवी दिल्ली - बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी होत असून बैठकीत दुटप्पी भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी. के. जैन यांनी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांना क्रिकेटमधील अनेक भूमिकांमधून एकाची निवड करण्यास सांगितलेले.
लोढा शिफारशींमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ याला महत्त्व आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. जैन म्हणाले, ‘माजी फलंदाज लक्ष्मणला तीनपैकी एकच भूमिका निवडावी लागेल.’ लक्ष्मण क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य असून त्याने राजीनामा देण्याची तयारी दाखविली. आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादचा तो मेंटर असून समालोचकही आहे.
गांगुली विश्वचषकात समालोचन करीत असून तो सीएसीचा सदस्य आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. आयपीएलमध्ये तो दिल्ली संघाचा सल्लागार आहे. सीओए शनिवारी होणाऱ्या बैठकीत जैन यांच्या आदेशावर विचार करेल, असे संकेत मिळाले. जैन यांचे आदेश बीसीसीआयला तंतोतंत लागू करावे लागतील. आदेशानुसार इरफान पठाण, पार्थिव पटेलआणि रॉबिन उथप्पा यांच्यासारखे खेळाडूही समालोचनापासून दूर होऊ शकतील.