नवी दिल्ली : तामिळनाडू प्रीमिअर लीग (टीएनपीएल) स्पर्धेला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण त्यांचे काही प्रथमश्रेणी क्रिकेटर आणि काही संशयित प्रशिक्षकांना मॅच फिक्सिंगसाठी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. तथापि, बीसीसीआयचे एसीयूचे प्रमुख अजितसिंह यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू या मॅचफिक्सिंग प्रकरणात अडकण्याची शक्यता मात्र फेटाळून लावली आहे.
तामिळनाडू क्रिकेट संघटनेने २0१६ मध्ये टीएनपीएलला सुरुवात केली होती आणि त्यात आठ फ्रँचायजी संघ सहभाग घेतात.
अजित म्हणाले, ‘‘काही खेळाडूंनी त्यांना अनोळखी लोकांचे वॉटस्अॅप संदेश येत आहे, असे सांगितले होते. हे कोण लोक आहेत याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही खेळाडूंचे म्हणणे ऐकून घेतले आहे आणि आम्ही हे संदेश पाठवणाऱ्यांचा तपास करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यात कोणताही आंतरराष्ट्रीय खेळाडू गुंतलेला नाही. कोणत्याही खेळाडूला जर संदेश मिळत असेल, तर त्याला आम्हाला माहिती द्यावी लागेल ही त्याची जबाबदारी आहे.’’ आतापर्यंत कोणत्याही संघाचे नाव उघडकीस आलेले नाही; परंतु मॅच फिक्सिंगच्या आरोपाशी टीएनपीएलचा एक फ्रँचायजीचे नाव जोडले जात आहे. हा संघ गेल्या काही वर्षांपासून बदनाम असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘टीएनपीएल तालिकेतील या संघाच्या तळातील तीन संघांत समावेश आहे. त्या संघाची मालकीही संशयास्पद आहे. त्यांनी जे खेळाडू आणि प्रशिक्षकांना निवडले ते दर्जेदार नाहीत. या प्रकरणात प्रशिक्षकाची भूमिकाही तपासाच्या फेºयात येऊ शकते.
बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, ‘‘कोणत्याही गोष्टी नाकारली जाऊ शकत नाही. एक प्रशिक्षक कलंकित आयपीएल फ्रँचायजीशी संबंधित होता, त्यानंतर त्याने रणजी संघाला कोचिंग दिले व एका हंगामासाठी टीएनपीएल फ्रँचायजीशी तो जुळला होता. त्या प्रशिक्षकाची चौकशी होऊ शकते.’’