Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीसाठी प्रशिक्षक-मेंटॉरची जोडी ठरली महत्त्वाची

दिल्ली कॅपिटल्सने सत्राच्या सुरुवातीला फारशी चांगली सुरुवात केली नाही, पण त्यानंतर त्यांनी आपला खेळ कमालीचा उंचावताना क्वालिफायर २ मध्ये धडक मारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 03:55 IST

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)दिल्ली कॅपिटल्सने सत्राच्या सुरुवातीला फारशी चांगली सुरुवात केली नाही, पण त्यानंतर त्यांनी आपला खेळ कमालीचा उंचावताना क्वालिफायर २ मध्ये धडक मारली. यामागे अनेक कारणे आहेत. त्यांच्याकडे चांगल्या युवा खेळाडूंची फळी आहे, तरी अतिउत्साहामध्ये त्यांच्या खेळाडूंनी अनेकदा विकेट फेकल्याही आहेत. पृथ्वी शॉ, रिषभ पंत यांच्यासारख्या युवा खेळाडूंनी उत्साहाच्या भरात आपल्या विकेट अनेकदा फेकल्या आहेत, पण नंतर त्यांनी आपल्या चुका सुधारून सामना जिंकण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना रोखणे कठीण होऊन गेले. त्यांची गोलंदाजी चांगली आहे. इशांत शर्मा, कागिसो रबाडा, अमित शर्मा, ख्रिस मॉरिस यांच्या समावेशाने दिल्लीच्या गोलंदाजीला मजबुती मिळाली. फलंदाजीत म्हणायचे झाल्यास शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुलीसारखे दिग्गज त्यांच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. याहून सर्वोत्तम पर्याय दिल्लीला मिळणार नव्हता. प्रशिक्षक आणि मेंटॉर यांचा खेळाडूंसह चांगला समन्वय असेल,तर कोणत्याही संघासाठी ती चांगली बाब ठरते आणि हेच दिल्लीसाठी निर्णायक ठरले.सामन्यात निर्णय घेण्यासाठी कर्णधार असतोच, पण सामन्याआधी आणि स्ट्रॅटेजिक टाइमआउटमध्ये मिळणाऱ्या टिप्स खूप महत्त्वाच्या असतात, ज्या प्रशिक्षक आणि मेंटॉरकडून मिळतात. त्यामुळे खेळाडूंना याचा चांगला फायदा मिळतो. अशीच एक अनुभवी प्रशिक्षकांची जोडी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मिळाली होती, पण याचा फायदा घेण्यात आरसीबीला यश आले नाही. प्रशिक्षक गॅरी कस्टर्न आणि गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा यांचे प्रयत्न कमी पडले. आरसीबीसाठी मोठी अडचण ठरली, ती सांघिक कामगिरीची. अनेकदा असे पाहण्यात आले की, जेव्हा फलंदाज चमकायचे, तेव्हा गोलंदाज अपयशी ठरायचे, तसेच कधी गोलंदाज छाप पाडायचे, तेव्हा फलंदाज निराशा करायचे. त्यामुळे पूर्ण सत्रामध्ये आरसीबी संघ विखुरलेला दिसला.यंदाच्या आयपीएलमध्ये अनेकांना दुखापती झाल्या आणि यामध्ये भारताला सर्वात मोठा धक्का बसला, तो केदार जाधव दुखापतग्रस्त झाल्याने. याविषयी मी माहितीही काढण्याचा प्रयत्न केला. केदारचे अद्याप एमआरआय स्कॅन होणे बाकी आहे. त्याला गंभीर फ्रॅक्चर नाही, जी भारतीय संघासाठी खूप चांगली बाब आहे. त्याला या दुखापतीतून सावरण्यास नक्कीच काही वेळ लागेल. तो एका आठवड्यातही तंदुरुस्त होऊ शकतो. २२ मे पर्यंत भारतीय विश्वचषक संघात बदल होऊ शकतात, पण इंग्लंडमध्ये केदारला नेले आणि तिथेही तो तंदुरुस्त झाला नाही, तर मात्र भारतीय संघात बदल करता येणार नाही. त्यामुळे माझ्यामते जर केदार शंभर टक्के तंदुरुस्त झाला नाही, तर भारतीय संघ त्याला इंग्लंडला घेऊन जाणार नाही. त्यामुळे पूर्ण तंदुरुस्त होणे केदारसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

टॅग्स :आयपीएल 2019