मुंबई: दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने गुरुवारी परस्पर हितसंबंधाच्या मुद्यावर बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी. के. जैन यांच्यापुढे आपली बाजू मांडली. यावेळी प्रशासकांच्या समितीने (सीओए) आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे उदाहरण देत हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केला.
द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) निर्देशक असून एका नामांकीत कंपनीमध्ये तो उपाध्यक्षपदीही आहे. यामुळे मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी द्रविडची तक्रार केली. द्रविडने कंपनीतून रजा घेतली असून पदाचा राजीनामा दिलेला नाही. याविषयी बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सीओए प्रमुख विनोद राय यांनी एक नोट लिहिली की, जर द्रविडने कंपनीतून रजा घेतली आहे, तर यात हितसंबंधाचा मुद्दा येत नाही. राजन यांनी आपल्या कार्यकाळात शिकागो विद्यापीठातून रजा घेतली होती.’