ठळक मुद्देओल्ड ट्रॅफर्ड येथे लँकेशीयर क्लबकडून नोंदवली गेलेली ही पहिलीच आणि क्लबच्या 50 वर्षांच्या इतिहासातील दुसरी हॅटट्रिक आहे.
यॉर्कशर - भारत - इंग्लंड यांच्यात 1 ऑगस्टपासून सुरू होणारी कसोटी मालिका आणि पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान याची विक्रमी खेळी, क्रिकेट वर्तुळात सध्या याच गोष्टींची चर्चा सुरू आहे. पण, सोमवारी कौंटी क्रिकेटमध्ये गोलंदाजाने केलेल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे. जो रूट, केन विलियम्सन आणि जॉनी बेअरस्टोव या जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये मोडणा-या फलंदाजांना सलग तीन चेंडूंत बाद करण्याचा पराक्रम जॉर्डन क्लार्क या अपरिचित गोलंदाजाने करून दाखवला आहे.
लँकेशीयर विरूद्ध यॉर्कशर यांच्यातील चार दिवसांच्या सामन्यात क्लार्कने हॅटट्रिक घेतली. लँकेशीयर क्लबचे प्रतिनिधित्व करणा-या क्लार्कने धावफलकावर 59 धावा असताना इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार रूटला पायचीत केले. त्यापाठोपाठ त्याने न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सन आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक बेअरस्टोव यांनाही माघारी पाठवले. या अव्वल खेळाडूंना सलग तीन चेंडूवर बाद करून क्लार्कने स्वतःचे नाव इतिहासात नमूद केले आहे.
ओल्ड ट्रॅफर्ड येथे लँकेशीयर क्लबकडून नोंदवली गेलेली ही पहिलीच आणि क्लबच्या 50 वर्षांच्या इतिहासातील दुसरी हॅटट्रिक आहे. क्लार्कने एकून पाच विकेट्स घेतल्या आणि यॉर्कशरचा पहिला डाव 192 धावांत संपुष्टात आणला.