अबू धाबी टी-१० स्पर्धेत (Abu Dhabi T10 League) कालचा दिवस अतिशय रंजक ठरला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणता संघ प्रवेश करणार हे ठरवणारा हा दिवस होता. यात ख्रिस गेलच्या (Chris Gayle) टीम अबुधाबीने (Team Abu Dhabi) अवघ्या अर्ध्या तासात दोन सामने खेळले. पण नशीबानं गेलच्या संघाची साथ दिली नाही. (chris gayle team abu dhabi out from race of final in t10 league)
गेलच्या संघाला सुरुवातीला 'एलिमनेटर वन'मध्ये विजय मिळवता आला. पण 'एलिमनेटर टू'मध्ये यश मिळालं नाही आणि टीम अबुधाबीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. या दोन्ही सामन्यांमध्ये ख्रिस गेलच्या बॅटमधून किती धावा निघाल्या हे जाणून घेऊयात. स्पर्धेचा अंतिम सामना आता शनिवारी रात्री साडेनऊ वाजता दिल्ली बुल्स आणि नॉर्दन वॉरियर्स या संघात खेळवला जाणार आहे.
ख्रिस गेलने पहिला सामना कलंदर्स संघाविरुद्ध खेळला. कलंदर्स संघानं प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्सच्या मोबदल्यात ८३ धावा केल्या. गेलच्या टीम अबुधाबीने ८.४ षटकांमध्ये चार विकेट्स गमावून ८४ धावांचं लक्ष्य गाठलं आणि विजय प्राप्त केला. या सामन्यात गेलनं ८ चेंडूंमध्ये १ चौकार आणि १ षटकार लगावत फक्त १५ धावा केल्या. संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे टीम अबुधाबीला यश मिळालं.
गेल वादळ शांत राहिल्यानं संघाला मोठं नुकसान
पहिल्या एलिमनेटरमध्ये विजय प्राप्त केल्यानंतर पुढच्या अर्ध्यातासातच गेल्या टीम अबुधाबीनं दुसऱ्या एलिमनेटर सामन्यात नॉदर्न वॉरियर्स संघाचा मुकाबला केला. या सामन्यात टीम अबुधाबीने प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्सच्या मोबदल्यात ११४ धावा केल्या. गेलची बॅट या सामन्यातही शांतच होती. गेलनं ६ चेंडूंवर फक्त ७ धावा केल्या. गेलच्या संघाकडून सलामीवीर पॉल स्टर्लिंगने १३ चेंडूत ४८ धावांची तुफान खेळी साकारल्यानं टीम अबुधाबीला शतकी धावसंख्या गाठता आली. पण या सामन्यात नॉदर्न वॉरियर्सने २ चेंडू शिल्लक राखून ७ विकेट्सने विजय प्राप्त केला. या विजयासह नॉदर्न वॉरियर्स संघाने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
नॉदर्न वॉरियर्स विरुद्ध दिल्ली बुल्स अंतिम सामना
ख्रिस गेलने अबुधाबी टी-१० स्पर्धेत आठ सामने खेळले. यात त्यानं १८.१४ च्या सरासरीनं आणि २११.६६ च्या स्ट्राइक रेटनं १२७ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत गेलच्या बॅटमधून फक्त १० चौकार आणि ११ षटकार पाहायला मिळाले. गेलची ८४ धावांची नाबाद खेळी वगळता उर्वरित सामन्यांत त्याला फक्त ४३ धावाच करता आल्या आहेत. आज रात्री साडेनऊ वाजता नॉदर्न वॉरियर्स आणि दिल्ली बुल्स संघात अबुधाबी टी-१० स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.