नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करूनही शिखर धवनला आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरी हे त्याला वगळण्यामागचे प्रमुख कारण आहे. आशिया खंडात खोऱ्याने धावा करणारा हा खेळाडू परदेशात मात्र अपयशी ठरला आहे. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.
धवनच्या निराशाजनक कामगिरीमुळे मयांक अग्रवालला वेस्ट इंडीज मालिकेसाठी संघात स्थान मिळाले. मयांकने स्थानिक क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मिळालेल्या या संधीचं सोनं करण्याची मयांकला संधी आहे. पण, शिखर धवनचे कसोटी संघातील स्थान धोक्यात आहे का? तर नाही.
भारतीय संघाचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी शिखरच्या भविष्याबाबत सुचक विधान केले आहे. ते म्हणाले," वन डे प्रकारात धावांचा पाऊस पाडणारा फलंदाज कसोटीत अपयशी ठरतो, याचे आश्चर्य वाटते. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याला फलंदाजी करताना पाहणे, नेहमी आनंददायी असते. त्यामुळेच त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय दुर्दैवी होता. मात्र, त्याने पुन्हा कसून सराव केला आणि राष्ट्रीय संघात येण्यायोग्य कामगिरी केली, तर त्यासाठी दरवाजे खुले आहेत."