Cheteshwar Pujara Century Surrey vs Sussex : इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट गाजवल्यानंतर भारताच्या कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा Royal London One-Day Cup स्पर्धेत धुमाकूळ घालतोय. ससेक्स क्लबकडून खेळणाऱ्या पुजाराने आज सरे क्लबच्या गोलंदाजांना इंगा दाखवला अन् स्पर्धेतील सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. या स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावताना पुजाराने List A क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. शतकासाठी १०४ चेंडू खेळल्यानंतर पुजाराने गिअर बदलला व पुढील २७ चेंडूंत ७४ धावा चोपल्या. त्याने मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.
पुजाराचे यंदाच्या इंग्लिश सत्रातील हे सातवे शतक ठरले. त्याने कौंटी क्रिकेटमध्ये ५ व आता वन डे क्रिकेटमध्ये दोन शतक झळकावली आहेत. प्रथम फलंदाजी करताना सरेच्या गोलंदाजांचा पुजारा व टॉम क्लार्क यांनी समाचार घेतला. या दोघांनीही शतक झळकावली. हॅरीसन वॉर्ड ( ५) व अली ओर ( ४) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर पुजारा व क्लार्क यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी केली. क्लार्क १०६ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने १०४ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजाराने १०४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने शतक पूर्ण केले.
शतक पूर्ण झाल्यानंतर पुजाराने गिअर बदलला आणि धावांची गती वाढवली. त्याने पुढील २७ चेंडूंत ७४ धावा कुटल्या. पुजारा १३१ चेंडूंत १७४ धावा केल्या. त्याच्या या खेळीत २० चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. म्हणजे त्याने ११० धावा या केवळ चौकार-षटकारांनीच कुटल्या. Royal London One-Day Cup स्पर्धेत नॉन इंग्लिश खेळाडूने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने कॉलिन इग्राम ( १५५) व निक वेल्स ( १२७*) यांचा विक्रम मोडला. लिस्ट ए क्रिकेटमधील पुजाराची ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्याने २०१२मध्ये भारत बी संघासाठी भारत ए विरुद्ध नाबाद १५८ धावा केल्या होत्या.
पुजाराच्या खेळीच्या जोरावर ससेक्सने ६ बाद ३७८ धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजांनी सरेचा संपूर्ण संघ ३१.४ षटकांत १६२ धावांत माघारी पाठवून २१६ धावांनी विजय मिळवला.