भारतीय क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. मागील अनेक वर्षांपासून त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. पुजाराच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटमधील भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली आहे.
चेतेश्वर पुजाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. "भारतीय संघाची जर्सी परिधान करणे, देशाचे राष्ट्रगीत आणि मैदानावर पाऊल ठेवताना मी प्रत्येक वेळी देशासाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला, ज्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. जसे म्हणतात की, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत निश्चित आहे, म्हणून मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे."
चेतेश्वर पुजाराने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर तो भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनला. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनंतर त्याला भारतीय कसोटी संघाची भिंत म्हणून ओळख मिळाली, त्याच्याकडे क्रीजवर टिकून राहण्याची अद्भुत क्षमता होती. पुजाराने २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला, जो त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
पुजाराने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ७ हजार १९५ धावा केल्या आहेत, ज्यात १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. पुजाराने भारतासाठी फक्त ५ एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने ५१ धावा केल्या. गेल्या जवळपास एक वर्षापासून तो भारतीय संघातून बाहेर होता आणि आता त्याने आपल्या यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.