चेन्नई : ‘उत्कृष्ट खेळाडू बनण्यात तसेच विपरीत परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याची किमया चेन्नई सुपरकिंग्सने मला शिकविली,’ अशा शब्दात यंदाच्या आयपीएलद्वारे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनास इच्छुक असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सीएसकेचे कौतुक केले. ‘मैदानाच्या आत आणि बाहेर संयमीवृत्ती बाळगण्याचे श्रेय सीएसकेला जाते,’ असेही तो म्हणाला.
गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या ५० षटकांच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करल्यापासून स्पर्धात्मकक्रिकेटपासून दूर असलेल्या माहीने सोमवारी सीएसके संघातून चिदम्बरम स्टेडियमवर सरावास सुरुवात केली. यावेळी चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागतही केले. प्रत्येक फटक्यावर चाहते जोरदार टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देत होते.
एका कार्यक्रमात धोनी म्हणाला, ‘सीएसकेने मला प्रत्येक गोष्ट सुधारण्यास मदत केली. मैदानाच्या आत आणि बाहेर कुठलीही परिस्थिती हाताळताना मी विनम्रता जोपासली. या शहराने आणि चाहत्यांनी जे प्रेम दिले ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.’ धोनीला या शहरातील चाहते ‘थाला’ असे संबोधतात. या शब्दाचा अर्थ होतो, ‘भाई’. ‘चाहत्यांचे प्रेम भावासारखेच आहे. मी दक्षिण भारतात किंवा चेन्नईत येतो तेव्हा कुणीही मला नाव घेऊन हाक मारत नाही. सर्वजण मला थाला म्हणून हाक मारतात. या शब्दाची वेगळी जादू आहे. या शब्दात आपलेपणाची भावना आणि प्रेम आहे. सोबतच ती व्यक्ती सीएसकेची चाहती आहे हे कळते,’ असे धोनी म्हणाला.
माजी भारतीय फलंदाज आणि राष्टÑीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी, ‘धोनीने घेतलेल्या ब्रेकचा लाभ त्याला ताजेतवाने राखण्यासाठी झाला,’ असे सांगितले. (वृत्तसंस्था)