मुंबई: महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं सनराइजर्स हैदराबादचा पराभव करत आयपीएल 2018चं जेतेपद पटकावलं. हैदराबादची गोलंदाजी यंदाच्या स्पर्धेत सर्वोत्तम मानली जात होती. मात्र अंतिम फेरीत हैदराबादचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. सलामीवीर शेन वॉटसनच्या घणाघाती शतकी खेळीमुळे चेन्नईनं हैदराबादवर 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयामुळे चेन्नईच्या नावावर अनेक विक्रम जमा झाले आहेत.
अंतिम सामन्यात हैदराबादला नमवत चेन्नईनं एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. एकाच स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला चारवेळा नमवण्याचा विक्रम धोनी सेनेनं करुन दाखवला. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ हैदराबादवर पूर्णपणे भारी पडला. साखळी सामन्यात दोन्ही लढतीत चेन्नईनं हैदराबादला पराभूत केलं. 22 एप्रिलला झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईनं हैदराबादवर 4 धावांनी विजय मिळवला. तर 13 मे रोजी झालेल्या दुसऱ्या साखळी सामन्यात 8 गडी राखून पराभूत केलं. यानंतर 22 मे रोजी झालेल्या क्लालिफारमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले. हा सामना चेन्नईनं 2 गडी राखून जिंकला. अंतिम फेरीतही चेन्नईनं हैदराबादला पराभूत करत आपणच सुपर किंग असल्याचं दाखूवन दिलं.
दोन वर्षानंतर आयपीएलमध्ये पुनरामगन करणाऱ्या चेन्नईनं तिसऱ्यांदा जेतेपद पटकावलं. यामुळे चेन्नईनं मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. विशेष म्हणजे मुंबईनं 11 आयपीएल खेळून तीनवेळा जेतेपद पटकावलंय. तर धोनी ब्रिगेडनं नऊवेळा आयपीएल खेळून तीनदा जेतेपदावर नाव कोरलंय. मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली तीनवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. तर धोनीनंही चेन्नईला तीनवेळा आयपीएल जिंकून दिली आहे.
कर्णधार म्हणून धोनीसाठी आयपीएल 2018 ही स्पर्धा स्पेशल ठरली. टी-20 स्पर्धेत कर्णधार म्हणून धोनीनं 150 वा विजय नोंदवला. या यादीत कोणताही खेळाडू धोनीच्या आसपासदेखील नाही. धोनीनंतर गौतम गंभीरनं 98 सामन्यात संघाला विजय मिळवून दिलाय.