आपल्या नम्र आणि दयाळू वर्तनासाठी ओळखल्या जाणाऱ्या डॅरिल मिचेलकडून ( Daryl Mitchell ) रविवारी एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला येथे सराव करताना अनावधानाने एका चाहत्याचा iPhone तुटला. अपघात लक्षात आल्यानंतर, न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने त्या तरुणाला एक भेट दिली.
प्रेक्षकांना इजा होऊ नये म्हणून मिचेल जवळच लहान नेट लावून त्याच्या पुल शॉट्सचा सराव करत होता. एक चाहता त्याच्या iPhoneवर हे नेट सेशन रेकॉर्ड करत होता. दुर्दैवाने, मिचेलचा एक पुल शॉट सेफ्टी नेटवर गेला आणि तरुणाला लागला. चेंडू लागल्याने तरुणाच्या फोनचेच नुकसान झाले नाही तर तो जखमीही झाला. मिचेलला परिस्थितीचे गांभीर्य आणि चाहत्याचे दुर्दैव समजले. त्यानंतर मिचेलने त्या चाहत्याला ग्लोव्ह्जची जोडी भेट म्हणून दिली. प्रेक्षकाने ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर पोस्ट केली. क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर डॅरिल मिचेलचे कौतुक केले आहे.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मिचेलने १९ चेंडूत दोन चौकार आणि एक षटकारांसह ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली कारण चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली. रवींद्र जडेजाने २६ चेंडूंत सर्वाधिक ४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबला २० षटकांत ९ बाद १३९ धावाच करता आल्या. जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. CSK सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी त्यांच्या ११ पैकी सहा सामने जिंकले आणि पाच गमावले.