कोलकाता : गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला चेन्नई सुपरकिंग्स रविवारी इडन गार्डन्सवर दुपारी ४ वाजता कोलकाता नाईट रायडर्सवर वर्चस्वपूर्ण विजय मिळवण्यासाठी खेळेल. यजमान संघाचा हुकमी एक्का आंद्रे रसेल याचे खेळणे शंकास्पद मानले जात असल्याने कोलकातावर अधिक दडपण असेल.
केकेआरला चेन्नईपाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा धक्का बसला. यामुळे त्यांची रसेलवर विसंबून राहण्याची वृत्ती चव्हाट्यावर आली आहे. मनगटाचे दुखणे उमळल्याने जमेकाचा रसेल चेन्नईविरुद्ध खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. शुक्रवारी तो चार षटके गोलंदाजी करू शकला नव्हता.
दुसरीकडे हैदराबाद येथे दिल्ली कॅपिटल्स रात्री ८ वाजता सनरायझर्स हैदराबादला नमवून विजयी लय कायम राखण्याच्या निर्धारासह उतरेल. आरसीबी आणि केकेआरवर मिळविलेल्या सलग दोन विजयासह येथे दाखल झालेल्या दिल्लीचा आत्मविश्वास उंचावला आहे.