Join us

खेळाडूंसाठी चार्टर्ड विमान, हॉटेल बुकिंग; बीसीसीआयचा निर्णय लवकरच

आयपीएल फ्रॅन्चायसी मालक झाले सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 06:13 IST

Open in App

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या शुक्रवारी झालेल्या वरिष्ठ कार्यकारिणी बैठकीत इंडियन प्रीमियर लीगचे १३ वे पर्व यंदा २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये भरवण्यावर एकमत झाले.

आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआय भारत सरकारकडे देशात आयपीएल आयोजनाबद्दल परवानगी मागेल, तोपर्यंत कोरोना परिस्थितीत सुधारणा न झाल्यास स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात येईल. बीसीसीआयने अद्याप याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला नसला तरी फ्रॅन्चायसी मालकांनी परदेशवारीची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोय ते हॉटेल बुकिंगची चौकशी करण्यापर्यंत काही संघमालकांनी सुरुवात केली आहे.

आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआय आणि संघ मालक यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. संघ मालक चार्टर्ड विमानांनी खेळाडूंना आयपीएलसाठी नेणार आहेत. आयपीएल संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवणार असल्याचे समजताच संघ मालक आपल्या खेळाडूंची अबू धाबी येथे कशी व्यवस्था होईल, हे पाहण्यात गुंतले आहेत. प्रत्येक संघात ३०-३५ खेळाडू आहेत. शिवाय सपोर्ट स्टाफही १०-१५ जणांचा असतो. पण हे कठीण दिसत असले तरी ते अशक्य नाही, असे बीसीसीआयला वाटते. अबूधाबीमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी आता बीसीसीआय आणि संघ मालकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

यासंदर्भात एका संघाच्या फ्रॅन्चायसी मालकांनी सांगितले की, ‘आयपीएलसाठी आम्ही अबूधाबी येथे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे खेळाडूंना खास चार्टर्ड विमानाने नेले जाईल. खेळाडू प्रवास आणि सराव कुठे व कसा करतील, या गोष्टींचाही विचार करण्यात आला. सध्या खेळाडू घरी असून सुरक्षित आहेत. अबूधाबीला जाण्याआधी सर्वांना विलगीकरणात राहावे लागेल. शिवाय कोरोना चाचणी होईल. सुरक्षेचे सर्व उपाय करूनच आम्ही खेळाडूंना अबूधाबीला घेऊन जाणार आहोत. अबूधाबी सरकारचे नियम असतील तेदेखील आम्हाला पाळावे लागणार आहेत.’

बीसीसीआयच्या मते, विमानातही खेळाडूंची सुरक्षितता पाळली जाईल. विमानात फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यात येईल. आॅगस्टमध्ये विमानसेवा पूर्ववत होणार की नाही, हे पाहावे लागेल. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू न झाल्यास विशेष परवानगीद्वारे चार्टर्ड विमानांनी खेळाडूंना घेऊन जावे लागेल.’

टॅग्स :बीसीसीआयकोरोना वायरस बातम्याआयपीएल