Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडसोबतच्या अंतिम सामन्यात विराट इतिहास रचणार, चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात मोठा विक्रम मोडणार?

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला ९ मार्च हा दिवस स्वतःसाठी ऐतिहासिक बनवण्याची सुवर्ण संधी आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:24 IST

Open in App

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा तर न्यूझिलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. खरे तर, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात हे दोन संघ तब्बल २५ वर्षांनंतर समोरा समोर आले आहेत. महत्वाचे म्हणजे, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला ९ मार्च हा दिवस स्वतःसाठी ऐतिहासिक बनवण्याची सुवर्ण संधी आहे. तो एक मोठा विश्वविक्रम करण्यापासून अगदी काही अंतरावर आहे.

कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! -खरे तर विराट कोहली या सामन्यात, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज होऊ शकतो. या विक्रमासाठी त्याला केवळ ४६ धावांचीच आवश्यकता आहे. हा विक्रम सध्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. या स्पर्धेच्या इतिहासात त्याने ७९१ धावा फटकावल्या आहेत. यानंतर विराटचाच क्रमांक लागतो. त्याने आतापर्यंत १७ सामन्यांमध्ये ७४६ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा फटकावणारे 5 फलंदाज -ख्रिस गेल - 791 धावाविराट कोहली - 746 धावामहेला जयवर्धने - 742 धावाशिखर धवन - 701 धावाकुमार संगाकारा - 683 धावा

आणखी एक मोठा पराक्रम करणारा फलंदाज ठरू शकतो विराट -विराट केवळ ख्रिस गेलचाच विक्रम मोडू शकतो असे नाही, तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ८०० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाजही ठरू शकतो. आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला हा टप्पा गाठता आलेला नाही. विराटने पाकिस्तानविरुद्ध नाबाद १००, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८४ धावांची खेळी खेळली आहे. तो सध्या चांगल्याच फॉर्मात दिसत आहे. यामुळे, अंतिम सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. 

टॅग्स :विराट कोहलीख्रिस गेलचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५