पाकिस्तान येथील कराची नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील लढतीनं चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या नवव्या हंगामाला सुरुवात झाली. सात वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. सलामी लढतीआधी कराचीच्या स्टेडियमवरुन लढाऊ विमाने फिरताना दिसली. स्टेडियम परिसरातील या सीन वेळी चाहत्यांसह न्यूझीलंडच्या ताफ्यातील रिअॅक्शन बघण्याजोगी होती.
... अन् कराची स्टेडियम परिसरात दिसली लढाऊ विमानांची खास झलक
सोशल मीडियावर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात काही खेळाडू हवेत उडणाऱ्या लढाऊ विमानांचा आवाज ऐकल्यावर त्या विमानांकडे पाहून उत्सुकतेनं पाहताना दिसते. तर काही खेळाडू थोडे बिथरल्याचेही दिसून येते. दुसऱ्या बाजूला स्टेडियममध्ये मॅचसाठी जमलेले काही प्रेक्षक हा सीन आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करताना दिसून आले. सलामीच्या लढतीआधी पाकिस्तान एरफोर्संनं खास कसरती अन् लढाऊ विमानांतून रंगाची आतषबाजी करत या स्पर्धेच्या शुभारंभात सहभाग घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या एक्स अकाउंटवरुनही काही खास व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. न्यूझीलंडच्या ताफ्यातील या खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एका विशेष हवाई शोचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान कराचीतील स्टेडियमवरून जेट विमाने उडताना दिसली. लढाऊ विमानांच्या कसरती प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या होत्या. पण न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि विल यंग याच्यासह ग्लेन फिलिप्स हे विमानाचे आवाजाने आश्चर्यचकित झाल्याचा सीन पाहायला मिळाला. सोशल मीडियावर न्यूझीलंडच्या ताफ्यातील या खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.