विराट कोहली फॉर्ममध्ये नाहीये, मग पाकिस्तानसोबत मॅच खेळवा अन् त्याची बॅटिंग बघा. पाकिस्तान संघाविरुद्ध मॅच असली की तो रंगात दिसणारच. पाक विरुद्धच्या लढतीत अनेकदा त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली आहे. आता पुन्हा एकदा त्याच्याकडून पाकिस्तान विरुद्ध क्लास खेळीची अपेक्षा आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला वनडेत १४ हजार धावा करण्यासाठी फक्त १५ धावांची आवश्यकता आहे. या धावा करताच तो एक नवा विक्रम प्रस्थापित करेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाक विरुद्ध किंग कोहलीसमोर एकाचं नाही दोघांचे असेल तगडे आव्हान
पाकिस्तान विरुद्ध कोहली पेटून उठतो अन् आपला तोरा दाखवतो, हे खरंय पण यावेळी त्याच्यासोर एक नाही तर दोन गोलंदाजांचे कडवे आव्हान असेल. त्यामुळे तो या दोन गोलंदाजांचा सामना कसा करतो, तो पाहण्याजोगे असेल. जाणून घेऊयात भारत-पाक यांच्यातील लढतीत कोहलीची खरी टक्कर कोणत्या गोलंदाजांविरुद्ध पाहायला मिळेल अन् ही रंगत अधिक कांटे की टक्कर का ठरू शकते, यासंदर्भातील खास स्टोरी
किंग कोहलीची लेग स्पिनर विरुद्धची लढाई
विराट कोहली मागील काही सामन्यात लेग स्पिनर विरुद्ध संघर्ष करताना पाहायला मिळाले आहे. मागील ५ डावात त्याने लेग स्पिनरविरुद्ध ५१ चेंडूत ३१ धावा करत ५ वेळा आपली विकेट गमावली आहे. या आकडेवारीमुळे किंग कोहली आणि पाकच्या ताफ्यातील लेग स्पिनर अबरार अहमद यांच्यातील लढाई महत्त्वपूर्ण होते. या गोलंदाजाचा विराट कोहली कसा सामना करतो ते पाहण्याजोगे असेल. श्रीलंका ते बांगलादेशच्या संघातील लेग स्पिनरसमोर विराट कोहली अडखळला आहे. पाकिस्तान विरुद्ध हा अडथा दूर करून तो मोठी खेळी खेळेल, अशी अपेक्षा आहे.
कोहलीला या जलदगती गोलंदाजापासूनही राहावे लागेल सावध
पाकिस्तानच्या ताफ्यातील नसीम शाह हा देखील किंग कोहलीसमोर आव्हान उभे करू शकतो. यामागचं कारण हे की, नसीम शाह सर्वोत्तम आउट स्विंग चेंडू टाकण्याची क्षमता असणारा जलदगती गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला विराट कोहली ऑफ स्टंम्प बाहेरील चेंडूवर सातत्याने फसताना दिसले आहे. त्यामुळे नसीम शाह वर्सेस विराट यांच्यातही एक वेगळी लढत पाहायला मिळेल.