जयपूर : राजस्थान रॉयल्सपुढे घरच्या मैदानावर शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून आयपीएलमध्ये स्थान टिकविण्याचे आव्हान असेल. ८ सामन्यात ६ पराभव आणि २ विजय मिळविणारा राजस्थान सातव्या स्थानी आहे. रॉयल्सने मागच्या शनिवारी मुंबईचा त्यांच्या घरी वानखेडे स्टेडियमवर पराभव केला होता. या विजयाची पुनरावृत्ती सवाई मानसिंग स्टेडियमवर करण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल. पण येथे त्यांचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही.
रॉयल्ससाठी जोस बटलरने ४३ चेंडूत ८९ धावा काढल्याने मुंबईला चार गड्यांनी पराभूत करणे सोपे झाले होते. अन्य फलंदाज मात्र धावा काढण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या खेळात सातत्याचा अभाव जाणवतो. दुसरीकडे मुंबईने दिल्लीवर ४० धावांनी विजय नोंदवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. मुंबई आधीच्या पराभवाचा वचपा काढून प्ले ऑफमध्ये स्थान निश्चितीचा प्रयत्न करेल. कर्णधार रोहित शर्मा व क्वींटन डिकॉक या सलामी जोडीपाठोपाठ हार्दिक व कृणाल पांड्या तसेच कीएरॉन पोलार्ड हे धावा काढण्यात आघाडीवर आहेत. जसप्रीत बुमराह व लसिथ मलिंगा हे प्रभावी माºयाच्या बळावर सामना फिरवू शकतात.