Shardul Thakur Mumbai Indians Syed Mushtaq Ali: सैयद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत आज रंगलेल्या मुंबई विरूद्ध आसामच्या सामन्यात मुंबईच्या शार्दुल ठाकूरने दमदार कामगिरी केली. लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात पालघरच्या शार्दुल ठाकूरने अप्रतिम गोलंदाजी केली. शार्दुलने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आसाम संघाच्या बॅटिंग लाइनअप उद्ध्वस्त केली. २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आसामच्या संघाचे फलंदाजी पहिल्या ३ षटकांतच डगमगली. यात शार्दुल ठाकूरने महत्त्वाची भूमिका बजावली. शार्दुलने आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये ७ चेंडूत ४ बळी घेत आसामच्या संघाला धक्के दिले. शार्दुल ठाकूरची चांगली गोलंदाजी मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला सुखावणारी आहे.
शार्दुलचा भेदक मारा
२२० धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आसाम मैदानात उतरला. मुंबईकडून गोलंदाजीची सुरुवात करणाऱ्या कर्णधार शार्दुल ठाकूरने पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेतल्या. त्याने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर आसामचा सलामीवीर दानिश दास, त्यानंतर षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अब्दुल अझीझ कुरेशी आणि पाचव्या चेंडूवर आसामचा कर्णधार रियान पराग यांना बाद केले आणि आसामची वरची फळी उध्वस्त केली. त्यानंतर स्वत:च्याच दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन आसामला आणखी एक धक्का दिला. शार्दुलने फक्त सात चेंडूत चार बळी टिपले. त्यानंतर त्याने त्याच्या तिसऱ्या षटकातही आणखी एका फलंदाजाला बाद केले आणि फक्त २३ धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या.
मुंबईचा आसामवर सहज विजय
शार्दुल ठाकूरच्या घातक गोलंदाजीमुळे मुंबईने आसामवर ९८ धावांनी सहज विजय मिळवला. २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आसामचा संघ १९.१ षटकात फक्त १२२ धावांतच गारद झाला. मुंबईचा गोलंदाज साईराज पाटील आणि अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर शाम्स मुलानी याने एक बळी घेतला.