मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत गटसाखळीतच गारद झालेल्या भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतानं व्हाईटवॉशच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार लोकेश राहुल यांच्या शानदार शतकी भागिदारीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडला नमवलं. या विजायनंतर रोहित शर्मानं खेळाडूंची कामगिरी आणि बेंच स्ट्रेंथबद्दल स्पष्टपणे आपली मतं मांडली.
'आम्ही अवघड परिस्थितीत चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडचा संघ उत्तम आहे. एका विकेटमुळे सामन्याचं चित्र बदलू शकतं. आमची बेंच स्ट्रेंथ अतिशय मजबूत आहे. नवे खेळाडू सलग क्रिकेट खेळत आहेत,' असं रोहित शर्मा म्हणाला. नवे खेळाडू जेव्हा खेळायला येतील, तेव्हा त्यांना कम्फर्टेबल वाटायला हवं. कर्णधार म्हणून माझं हेच काम आहे. खेळाडूंना स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टीनं हे अतिशय आवश्यक आहे. बाहेरच्या गोष्टींची चिंता करायची नाही. मैदानात केवळ खेळाचा विचार करायचा, असं शर्मानं सांगितलं.
भारतीय संघाकडे असलेल्या बेंच स्ट्रेंथबद्दलही रोहित शर्मा भरभरून बोलला. 'संघात अनेक तरुणांचा भरणा आहे. बऱ्याचशा खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा फारसा अनुभव आहे. बरेचसे खेळाडू संधीची वाट पाहत आहेत. त्यांना नक्कीच संधी मिळेल. प्रत्येकाला संधी मिळेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मैदानावर उतरलेल्या प्रत्येक खेळाडूनं त्याच्या बाजूनं १०० टक्के प्रयत्न करायला हवेत. त्याच्यावर देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करायला हवी,' असं शर्मा म्हणाला.