Join us

रडणाऱ्या मुलासारखी झाली कर्णधार बेन स्टोक्सची अवस्था

मोठे सामने हे केवळ दिग्गज खेळाडू आणि आक्रमक धोरणांच्या जोरावर जिंकता येत नाहीत, तर वेळप्रसंगी दाखवलेला कमालीचा संयम आणि जिगरबाज वृत्ती संघाचा उत्कर्ष साधू शकते, हे चॅम्पियन भारतीयांनी मँचेस्टरवर दाखवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 10:53 IST

Open in App

- मतीन खान

मोठे सामने हे केवळ दिग्गज खेळाडू आणि आक्रमक धोरणांच्या जोरावर जिंकता येत नाहीत, तर वेळप्रसंगी दाखवलेला कमालीचा संयम आणि जिगरबाज वृत्ती संघाचा उत्कर्ष साधू शकते, हे चॅम्पियन भारतीयांनी मँचेस्टरवर दाखवून दिले.

ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर जेव्हा चौथ्या कसोटीच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा हा सामना आपण जवळपास जिंकलाच आहे, अशाच आविर्भावात इंग्लंडचा संघ वावरत होता. तसेच ऋषभपंत दुखापतग्रस्त झाल्याने भारताची मधली फळी लवकरच धारातीर्थी पडेल, असा कर्णधार बेन स्टोक्सचा कयास होता. शिवाय, जेवणाची घंटा वाजेपर्यंत भारताने लोकेश राहुल (२३० चेंडूत ९० धावा) आणि कर्णधार शुभमन गिल (२३८ चेंडूत १०३ धावा) या खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजांना गमावले होते.

राहुल आणि गिल फलंदाजी करत असताना भारतीय चाहते काहीसे सुखावले होते. कारण, त्यांनी १८८ धावांची भागीदारी करताना तब्बल ७० षटके खेळपट्टीवर भक्कमपणे पाय रोवले होते. मात्र, या दोघांना बाद करण्यात यश मिळाल्यानंतर इंग्लंडला शेखचिल्लीसारखी स्वप्ने पडायला लागली. पण, त्यांच्या या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी केले. दोघांनी जवळपास ५६ षटके फलंदाजी करताना २०३ धावा जोडल्या.

६०० धावांचे लक्ष्यही चेस करू शकतो, असा दावा करणारे बॅझबॉलचे महारथी अखेर रडायला लागले होते. कोहली आणि रोहितच्या अनुपस्थितीत ही मालिका सहज जिंकू, असा अंदाज त्यांनी बांधला होता. पण, झाले उलटेच. गिल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इंग्लंडच्या नाकात दम करून ठेवला आहे.सुरुवातीला त्यांची रणनीती फक्त जसप्रीत बुमराहपासून वाचण्याची होती. पण, मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने त्यांना चीतपट केले. ६०० धावांचा दावा करणारे दुसऱ्या कसोटी सामन्यात ६०८ धावांच्या लक्ष्यापुढे ३३६ धावांनी पराभूत झाले होते.

लॉईस कसोटीतही इंग्लंडच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास भारतीयांनी जवळपास हिरावलाच होता. पण, दुर्दैवाने सिराजने खेळून काढलेला चेंडू यष्टीवर जाऊन आदळला. जर भारत ही कसोटी जिंकला असता तर स्टोक्स आणि मॅक्युलमला तोंड लपविण्याशिवाय पर्याय नव्हता.

चौथ्या कसोटीत पंत अनुपस्थित असताना दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजीला दबावात टाकण्याची यजमानांकडे उत्तम संधी होती. पण, ते १४३ षटकांमध्ये केवळ चारच बळी घेऊ शकले. महत्त्वाचे म्हणजे, यातील दोन बळी तर पहिल्याच षटकात गेले होते.

'हस्तांदोलन' करण्याची जिद्द, पण अखेर अवस्था झाली रडवेली

नेहमीच आक्रमकतेचा बुरखा पांघरून वावरणाऱ्या कर्णधार बेन स्टोक्सची अवस्था केविलवाणी झाली होती. थकव्यामुळे अखेरच्या सत्रात त्याचे खांदे पडले होते. त्यामुळे शेवटचा तास सुरू होताच त्याने रवींद्र जडेजाकडे जात सामना संपविण्याचे आपले मनसुबे उघड केले. मात्र, कसोटी क्रिकेटच्या नियमानुसार दोन्ही संघांतील खेळाडूंची परस्पर सहमती असेल तरच सामना वेळेआधी थांबवता येऊ शकतो. पण, बेन स्टोक्सने हेतुपुरस्सर चुकीची वेळ निवडली होती. कारण, त्यावेळी जडेजा ८९ आणि सुंदर ८० धावांवर खेळत होते. दोघेही आपल्या शतकानजीक होते. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याची चालून आलेली ही संधी सहसा कोणीही सोडत नाही. त्यामुळेच जडेजाने ड्रॉसाठी हात मिळवण्यास नकार दिला. नियमानुसार यात काही चुकीचे नव्हते.

अशोभनीय आचरण

जडेजाच्या या नकारानंतर बेन स्टोक्सचा संयम ढळला. रडवेल्या अवस्थेत तो जडेजावर चिडचिड करायला लागला. तुला शतक झळकवायची इतकीच इच्छा होती तर आधीच वेगाने खेळायचे होते, अशी कुरकुर त्याने जडेजाकडे केली. यानंतर त्याने अधिक तिरसटपणा दाखवत हॅरी ब्रूकच्या गोलंदाजीवर शतकाचे स्वप्न पूर्ण करून घे, असा शेरा जडेजावर लगावला.

इंग्लंडच्या कर्णधाराने केलेले हे वर्तन पूर्णपणे अशोभनीय होते. चिडक्या स्टोक्सची ही अवस्था बघून भारताने उरलेली पूर्ण षटके फलंदाजी करत इंग्लंडच्या खेळाडूंना अधिक थकवायला हवे, असे समालोचन करणारे सुनील गावसकर म्हणाले.

वैतागलेल्या स्टोक्सने सामना संपल्यानंतर जडेजा आणि सुंदरसोबत नीट हस्तांदोलनदेखील केले नाही. याचा अर्थ काय, तर तुम्ही आमचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे आम्ही असेच वागणार. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीदेखील सवाल उपस्थित केला की, जर दोन इंग्लिश फलंदाज शतकानजीक असते तर स्टोक्सने ड्रॉसाठी हात मिळवला असता का? म्हणजे काहीही गरज नसताना भारतावर नैतिक दबाव टाकण्याची रणनीती स्टोक्सने अवलंबली होती. 

टॅग्स :बेन स्टोक्सभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंड