स्वदेशी कोच फायनल जिंकवू शकत नाहीत का?

टीम इंडियाने आयसीसी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पराभूत होण्याचा पायंडा कायम राखला! भारतीय संघाबाबतीत हे असे वारंवार घडू लागलेले आहे... असे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 08:22 AM2023-06-18T08:22:37+5:302023-06-18T08:23:15+5:30

whatsapp join usJoin us
Can't indigenous coaches win finals? | स्वदेशी कोच फायनल जिंकवू शकत नाहीत का?

स्वदेशी कोच फायनल जिंकवू शकत नाहीत का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- किशोर बागडे
(उपमुख्य उपसंपादक, नागपूर)

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे २०१३ मध्ये अजिंक्यपद पटकावल्यानंतर आजवर एकाही आयसीसी स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळू शकलेले नाही. आयपीएलसारख्या बाजारू किंवा फ्रँचाइझी क्रिकेटला प्राधान्य दिल्यामुळे हे घडत असावे, अशी सरधोपट मीमांसा केली जाते. ती अंशत: खरी आहे. परंतु फ्रँचायझी क्रिकेट आपल्याकडे १५ वर्षांपासून खेळविले जाते. ते सुरू झाले त्यानंतर सहा वर्षांत २०११ मधील जगज्जेतेपदासह दोन अजिंक्यपदे वाट्याला आली होती. २०१३ नंतर हा स्रोत इतका आटला कसा?

बीसीसीआयच्या दृष्टीने आयसीसी स्पर्धांचे अजिंक्यपद हे प्राधान्यक्रमात खालच्या पायरीवर गेलेले आहे. बलाढ्य मंडळांमध्ये भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे नाव घेतले जाते. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय, टी-२० आणि आता कसोटी प्रकारांमध्ये; तर इंग्लंडने एकदिवसीय आणि टी-२० प्रकारांत अलीकडच्या काळात जगज्जेतेपद मिळवले. आमची पाटी मात्र कोरीच! कारण ट्रॉफीपेक्षा धनलाभाची आम्हास अधिक चिंता. 

१९९० पासून २९ वर्षांत बीसीसीआयने १५ विदेशी आणि चार देशी कोच संघासाठी आणले. संघाला यशस्वी करण्यात देशी की विदेशी कोच अधिक सक्षम, अशी समीक्षा झाल्यास २००० पासून भारत चार विदेशी कोचेसच्या मार्गदर्शनात यशस्वी झाला. जॉन राइट हे पहिले विदेशी कोच. त्यांनी भारताला मैदानावर संघर्ष करण्याचा मंत्र शिकविला. गॅरी कर्स्टन यांनी २०११चा वन डे विश्वचषक जिंकून दिला. डंकन फ्लेचर यांनी एका विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचविले होते. २०१३ ला भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स करंडक जिंकला, त्याआधीच फ्लेचर हे आईच्या निधनामुळे द. आफ्रिकेला रवाना झाले होते.

२००० ते २०१५ या काळात चार विदेशी कोच होते. त्यावेळी १४२ पैकी ५७ कसोटीत विजय मिळाला. ४१ पराभव झाले, तर ४४ सामने अनिर्णीत राहिले. गेल्या पाच वर्षांत देशी कोचेसच्या मार्गदर्शनात ४९ पैकी ३० सामने जिंकण्यात यश आले, तर आठ सामने अनिर्णीत राहिले. जय-पराजयाचा विचार केल्यास विदेशी कोचेसनी भारताला ३९, तर देशी कोचेसनी ६१ टक्के कसोटी यश मिळवून दिले आहे. कोच मैदानाबाहेर कितीही प्रभावी असेल; पण मैदानावर तर खेळाडूला कामगिरी करायची असते. त्याची मानसिकता, सांघिक यशाची तयारी वैयक्तिक लालसेला तिलांजली देण्याची भावना या गोष्टी यशोगाथा रचण्यात मोलाच्या ठरतात. 

टीम इंडिया कोच आणि त्यांची कामगिरी...

कोच     देश     कार्यकाळ     कसोटी     विजय     पराभव     अनिर्णीत
जॉन राइट    न्यूझीलंड     २०००-२००५     ५१     २०     १४     १६
ग्रेग चॅपेल     ऑस्ट्रेलिया     २००५-२००७     २०     ८     ४     ८
गॅरी कर्स्टन     द. आफ्रिका     २००७-२०११     ३३     १६     ६     ११
डंकन फ्लेचर     झिम्बाब्वे     २०११-२०१५     ३९     १३     १७     ९
रवी शास्त्री     भारत     २०१४-२०१६     १४     ५     ५     ४
संजय बांगर     भारत     २०१६ अंतरिम     ३     ३     ०     ०
अनिल कुंबळे     भारत     २०१६-२०१७     १७     १२     १     ४
रवी शास्त्री     भारत     २०१७-२०२१     २४     १३     ६     ५
राहुल द्रविड     भारत     *२०२१ पासून     १४     ९     ४     १
*नोव्हेंबर २०२१

आयसीसी ट्रॉफी आणि भारत...
२०१४ टी-२० विश्वचषक 
अंतिम फेरीत 
लंकेकडून पराभूत
२०१५ वन डे विश्वचषक 
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
२०१६ टी-२० विश्वचषक
उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभव
२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी 
अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव
२०१९ वन डे विश्वचषक 
उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव
२०२१ डब्ल्यूटीसी फायनल 
अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभव
२०२२ टी-२० विश्वचषक
उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव
२०२३ डब्ल्यूटीसी फायनल
अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

Web Title: Can't indigenous coaches win finals?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.