इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत दुखापतमुळे मालिकेतून बाहेर पडला. डॉक्टरांनी पंतला सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर एखादा फलंदाज रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेल्यास त्याच्याजागी दुसरा खेळाडू फलंदाजी करू शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
भारताच्या डावातील ६८ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला. क्रिस वोस्कच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरु झाला. दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब फिजिओ मैदानात आले. नंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले, जिथे त्याच्या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यानंतर क्रिक बझने ऋषभ पंत मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती दिली. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला सहा आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
ऋषभ पंतच्या जागी दुसरं कोणी फलंदाजी करू शकतो का?आयसीसीच्या नियमांनुसार, जेव्हा एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत होते आणि तो खेळू शकत नाही, तेव्हा संघाला कन्कशन सब्सिट्यूट मिळतो. महत्त्वाचे म्हणजे, दुखापतग्रस्त खेळाडू आणि त्याच्या जागी संघात निवड करण्यात येणारा खेळाडूची कामगिरी जवळपास एकसारखीच असायला हवी.
भारताचा पहिल्या दिवशीचा खेळसलामीवीर यशस्वी जैस्वाल (५८ धावा) आणि साई सुदर्शन (६१ धावा) यांनी अर्धशतक झळकावून भारताची धावसंख्या २५० पार पोहोचवण्यास सिंहाचा वाटा उचलला. भारताने चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चार विकेट्स गमावून २६४ धावा केल्या. सलामीवीर केएल राहुल आणि जैस्वालने पहिल्या विकेट्ससाठी ९४ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर साई सुदर्शन आणि करूण नायरने मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले.